‘आयआरबी’सोबत उद्या बैठक
By Admin | Updated: December 1, 2014 00:39 IST2014-12-01T00:37:55+5:302014-12-01T00:39:38+5:30
अपूर्ण कामे : आयआरबीच्या प्रतिनिधींना आंदोलकांची धास्ती

‘आयआरबी’सोबत उद्या बैठक
कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील अपूर्ण कामांची माहिती घेणे, केलेल्या कामांचा आढावा घेणे, कामांतील त्रुटी याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व आयआरबीच्या प्रतिनिधींची मंगळवारी (दि.२) कोल्हापुरात बैठक होत आहे. शहरातील अपूर्ण कामांबाबत अशा स्वरूपाची दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याची सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्राव्दारे केली आहे. आंदोलकांच्या धास्तीमुळे ‘आयआरबी’ने ही बैठक पुण्याला घेण्याबाबत प्रयत्न चालविले आहेत.
रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरातून पलायन केले. एका रात्रीत कोल्हापुरातील कार्यालय पुण्यात हलविले. कोल्हापुरातील २२० कोटी रुपयांचा एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण करण्याची व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी महामंडळाची आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलने होऊ लागल्यानंतर दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातून पलायन केले.
टोलविरोधी कृती समितीने रस्त्याचा दर्जा, युटिलिटी शिफ्टिंग, विजेचे दिवे, रस्त्याकडील चॅनेल, अपूर्ण कामे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. ही सर्व कामे करण्याबाबत महापालिकेनेही वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, महामंडळाने याकडे लक्ष दिले नाही. आयआरबीने तर महापालिकेला पत्र लिहून अपूर्ण कामे करण्यास कोल्हापुरात सुरक्षित वातारवण नसल्याने काम करण्यास असहमती दर्शविली. त्यामुळेच आयुक्तांनी आयआरबी व महामंडळाच्या प्रतिनिधींना अपूर्ण कामांबाबात दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. केलेल्या कामांचा दर्जा व टोलबाबत आलेल्या तक्रारीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. अपूर्ण कामांबाबत काही शंका असल्यास एकत्रित भेटी देणेही सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)
प्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी असल्याने महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत होणे गरजेचे आहे. प्रकल्पातील त्रुटी व अपूर्ण कामांवर लक्ष ठेवणे त्यामुळे सोयीचे होणार आहे. मात्र, टोल विरोधी कृती समितीच्या धास्तीने महामंडळ किंवा आयआरबीच्या प्रतिनिधींनी कोल्हापुरात बैठकीस नकार दिला आहे. दर पंधरा दिवसांनी कोल्हापुरात आढावा बैठक घेण्याबाबत आयुक्त ठाम असल्याने आयआरबी व महामंडळाची गोची झाल्याची चर्चा आहे.