उद्या उडणार धमाका, रंगणार गुलाल!
By Admin | Updated: October 17, 2014 23:52 IST2014-10-17T23:30:10+5:302014-10-17T23:52:53+5:30
मतमोजणीची उत्सुकता : सर्व तयारी पूर्ण; उमेदवारांची धडधड वाढली, जल्लोषासाठी फटाके, गुलालाची मागणी

उद्या उडणार धमाका, रंगणार गुलाल!
कोल्हापूर : मतमोजणीचा दिवस जसा जवळ येईल, तशी निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेल्या उमेदवारांची धडधड वाढायला लागली आहे. सर्वसामान्य जनतेतही निकालाबाबत कुतूहल वाढले असून, प्रत्येकजण आकडेमोड करून आपापला अंदाज बांधण्यात व्यस्त आहे. जिल्ह्यात असलेल्या दहा मतदारसंघांत रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. सकाळी अकरापर्यंत निकाल लागलेले असतील. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणीत जल्लोष रंगणार आहे.
१४ टेबलांवर मोजणी
दहाही मतदारसंघांत एकाचवेळी म्हणजे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या समक्ष मतदान यंत्रे सील केलेल्या खोल्या उघडण्यात येतील. प्रत्येक मतमोजणी केंद्रात १४ टेबल मांडण्यात येणार आहेत. प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी मतमोजणीच्या प्रक्रियेत भाग घेतील. प्रत्येक फेरीत साधारण १२ ते १५ हजार मतांची मोजणी होणार असून, अशा वीसहून अधिक फेऱ्या होतील, असा अंदाज आहे.
चंदगड : पॅव्हेलियन हॉल, नगरपरिषद, गडहिंग्लज
राधानगरी : तालुका क्रीडासंकुल, मौनी विद्यापीठ, गारगोटी.
कागल : जवाहर नवोदय विद्यालय, कागल (ता. कागल)
कोल्हापूर (दक्षिण) : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बिल्डिंग, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूर तळमजला, उत्तर बाजू.
कोल्हापूर (करवीर) : पहिला मजला, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बिल्डिंग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूर तळमजला, उत्तर बाजू.
कोल्हापूर (उत्तर) : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट बिल्डिंग, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूर तळमजला, दक्षिण बाजू.
शाहूवाडी : तहसीलदार कार्यालय, शाहूवाडी.
हातकणंगले : शासकीय धान्य गोदाम, हातकणंगले.
इचलकरंजी : राजीव गांधी गोदाम, हातकणंगले.
शिरोळ : पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती, शिरोळ.
दीडशे टन गुलाल अन् कोटीचे फटाके
कोल्हापूर : यंदा दिवाळीच्या तोंडावरच विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्याने कोल्हापुरात फटाक्यांची उलाढालही कोटीच्या घरात होत आहे; तर विजयोत्सवात महत्त्व असलेल्या गुलालाचीही तब्बल दीडशे टन आवक झाली आहे.
निवडणूक प्रचाराच्या कालावधीत दिवसाकाठी जिल्हाभरातून लाखो रुपयांचे फटाके विकले गेले आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने फटाके विक्रेत्यांचीच दिवाळी आहे, असे म्हणावे लागेल. शिवकाशी (कर्नाटक) येथून आलेल्या एक, दोन, तीन, पाच आणि दहा हजारांच्या मोठ्या फटाक्यांच्या माळांना विशेष मागणी आहे. रविवारी निकालानंतर फटाक्यांची मोठी उलाढाल अपेक्षित आहे. गुलालही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मागविला आहे. यंदा इस्लामपूर, पंढरपूर, सोलापूर या भागांतून दीडशे टनांपेक्षा अधिक गुलाल मागविला आहे. सरपंच गुलालास अधिक मागणी आहे.
पूर्वीसारखे औट न उडविता कार्यकर्त्यांची पहिली पसंती आता पाच, दहा हजारांच्या माळांना असते. त्यामुळे हा माल कोल्हापूरच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे.
- एम. डी. शिकलगार, फटाके विक्रेते
जादा रंगणारा गुलाल म्हणून ‘पंढरपुरी सरपंच’ गुलालास कोल्हापुरात राजकीय कार्यकर्त्यांकडून मोठी मागणी आहे. सर्वसाधारण ७० रुपये किलोप्रमाणे याचा दर आहे.
- फय्याज अत्तार, गुलाल विक्रेता
पैजा रंगू लागल्या...
विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते आकडेमोड करीत आहेत. कोणत्या केंद्रातून आपल्याला किती मते पडली असणार, याचा अंदाज बांधत आहेत. प्रत्येक उमेदवारांचे समर्थक आमचेच ‘साहेब’ कसे निवडून येणार, यासंबंधी युक्तिवाद करीत आहेत. यातूनच गावागावांत लहान-मोठ्या पैजा लागत आहेत.
सर्वच मतदारसंघांत तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे अमुकच उमेदवार निवडून येईल, असे छातीठोकपणे कोणीही सांगत नाहीत. तर्क-वितर्कावर अंदाज बांधत आहेत. प्रत्येकजण कोण निवडून येईल, अशी विचारणा राजकीयदृष्ट्या जाणकार असलेल्या मंडळींना करीत आहे.
दरम्यान, १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निकाल लागेपर्यंत कोण निवडून येणार, यावर गावागावांत पैजा रंगत राहणार आहेत. अमुक हा उमेदवार निवडून आल्यास मी कोंबडी देतो, पार्टी देतो, मिशा काढतो अशा पैजा रंगत आहेत. निकालांसाठी हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंत पैजा लागल्या आहेत.
वाहतुकीचे नियोजन असे राहील...
कोल्हापूर शहरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत कोल्हापूर उत्तर, दक्षिण व करवीर अशा तीन मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या इमारतीच्या सभोवतालचे रस्ते वाहतुकीसाठी रविवारी दुपारी मतमोजणीचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.
शिवाजी विद्यापीठासमोरील रस्ता पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे कागल, निपाणी या भागांतून येणारी सर्व वाहतूक ही उजळाईवाडी येथून पुढे महामार्गाने तावडे हॉटेलकडे जाईल व तेथून ती कोल्हापूर शहराकडे येईल. निपाणी, बेळगावला जाण्यासाठीदेखील हाच मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
टेंबलाई रेल्वे गेट ते शिवाजी विद्यापीठ हा रस्ता बंद राहणार आहे. या मार्गावरून पुढे कागल, निपाणीकडे जाणारी वाहने ही ताराराणी चौकातून तावडे हॉटेलमार्गे पुढे जातील.
सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ, तसेच सरनोबतवाडीकडे जाणारा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. या मार्गावरून जाणारी वाहने राजेंद्रनगर, शांतिनिकेतनमार्गे पुढे महामार्गाकडे जातील.
सायबर चौक, टेंबलाई रेल्वे फाटक, शाहू जकात नाका येथे बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला जाणार आहे.