कळंब्यातील वृक्षसंवर्धनासाठी टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:16 IST2021-02-22T04:16:07+5:302021-02-22T04:16:07+5:30

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली ...

Tolvatolvi for arboriculture in Kalamba | कळंब्यातील वृक्षसंवर्धनासाठी टोलवाटोलवी

कळंब्यातील वृक्षसंवर्धनासाठी टोलवाटोलवी

कळंबा : कळंबा तलावाभोवती वनसंपदा निर्माण करून त्याचे रुपडे पालटण्यासाठी २०१८ मध्ये प्रशासनाकडून तब्बल चार हजार वृक्षांची लागवड केली खरी. मात्र, ती झाडे जगवायची कुणी, त्याची जबाबदारी कुणी घ्यायची यावरून प्रशासनातीलच दोन विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे कळंबा तलावावरील लाखो रुपये खर्चून फुलवलेले हे नंदनवन कोमेजून जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे फिरावयास येणारे नागरिक झाडांना पाणी घालून ही झाडे जगवत असल्याचे चित्र आहे. कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामांतर्गत तलावास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी २०१८ साली कळंबा तलाव परिसरात चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांची लागवड करण्यात आल्यानंतर सहा महिने निविदाधारक कंपनीने संवर्धन केले. त्यानंतर हेच काम पालिका पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने त्यावेळी दोन वेळा मुदतवाढ घेतली होती. तज्ज्ञ कर्मचारीवर्गाअभावी वृक्षसंवर्धनाचे काम उद्यान विभागाने स्वीकारावे, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाची आहे, तर पालिका हद्दीतील उद्याने संवर्धनासाठी कर्मचारीवर्ग तोकडा पडत असल्याने हेच काम पाणीपुरवठा विभागानेच करावे, असे सांगत उद्यान विभागानेही या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून फुलवलेल्या या नंदनवनाचे संवर्धन करायचे कोणी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनातील या टोलवाटोलवीमुळे ही हिरवळ करपण्याची भीती व्यक्त होत आहे.

झाडे जगवली, वाढवली तरच पर्यावरण संतुलन राहणार आहे. बेसुमार वृक्षतोडीने निर्माण झालेल्या पर्यावरणाचा असमतोल दूर करण्यासाठी एकीकडे शासन, सामाजिक संस्था एकच लक्ष शतकोटी वृक्ष मोहीम राबवित असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या ताकतुंब्यात कळंबा तलाव परिसरातील वनसंपदा कोमेजून जात असल्याचे चित्र आहे.

कर्मचारी नियुक्ती गरजेची : कळंबा तलावाची मालकी महानगरपालिकेची आहे. तलावाच्या संवर्धनासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला नसल्याने तलावाच्या हद्दीत वीस एकरांत अतिक्रमण झाले आहे. सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात येत आहे. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले, पार्ट्यांसाठी होत आहे. ऐतिहासिक शाहूकालीन तलावाच्या संवर्धनासाठी कर्मचारी नियुक्ती करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फोटो : २१ कळंबा तलाव

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कळंबा तलाव परिसरातील चार हजार वृक्षांची दुरवस्था झाली आहे.

Web Title: Tolvatolvi for arboriculture in Kalamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.