टोलवसुलीचं धाडस होईना
By Admin | Updated: June 13, 2014 01:57 IST2014-06-13T01:42:54+5:302014-06-13T01:57:59+5:30
एक महिना थांबण्याचे केले आवाहन

टोलवसुलीचं धाडस होईना
कोल्हापूर : शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले टोलविरोधातील आंदोलन, राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्यांच्या मूल्यांकनासाठी नेमलेली तज्ज्ञांची समिती, कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांनी मूल्यांकन होईपर्यंत एक महिना थांबण्याचे केलेले आवाहन, पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही म्हणून दक्षता घेण्याबाबत बजावलेली नोटीस आणि टोल सुरू झाल्यास आम्ही बघून घेऊ, असा शिवसेनेने दिलेला इशारा, अशा सर्व पार्श्वभूमीवर संभ्रमात सापडलेल्या ‘आयआरबी’ कंपनीने आज, गुरुवारीही टोलवसुलीचे धाडस दाखविले नाही. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील परिस्थितीचा नेमका अंदाज येत नसल्याने टोलवसुलीचे काम पुढे पुढे ढकलण्यात येत आहे.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने टोलनाक्यांवर पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिल्यानंतर ‘आयआरबी’ने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून बंदोबस्त मिळविला आहे. सर्व नाक्यांवर गेल्या दोन-तीन दिवसांत जोरदार तयारी करण्यात आली आहे. या नाक्यांवर कर्मचारी, पोलीस बंदोबस्त सज्ज आहे. फक्त एक आदेश आला की, टोलची पावती फाटली जाईल, अशी परिस्थिती शहरातील सर्वच नऊ टोलनाक्यांवर आहे.
‘आयआरबी’चे काही अधिकारी कोल्हापुरात आले आहेत. त्यांच्या बैठका सुरूच आहेत, पण त्यांच्याकडून कोणताही निर्णय होत नसल्याने नाक्यांवर ड्यूटीला आलेले कर्मचारी केवळ बसून आहेत. काल, बुधवारी दुपारपासून टोल सुरू होणार, अशी आधी हूल उठविली गेली. परंतु, काल रात्रीपर्यंत तरी काहीच हालचाली दिसल्या नाहीत. त्यानंतर पुन्हा आजपासून टोलवसुली सुरू केली जाणार आहे, अशी हूल उठविण्यात आली. प्रत्यक्षात आजचा दिवसही ‘फूस’ झाला. आजही कर्मचारी वसुलीच्या आदेशाची प्रतीक्षा करीत बसले होते. रात्रीपर्यंत तरी त्यांना कोणतीही सूचना मिळाली नाही. (प्रतिनिधी)