किणी, तासवडे नाक्यांवर टोल दरवाढ
By Admin | Updated: June 28, 2014 00:46 IST2014-06-28T00:46:32+5:302014-06-28T00:46:46+5:30
जुलैपासून लागू : वाहनधारकांना चार रुपयांपासून १४ रुपयांपर्यंतचा जादा भुर्दंड बसणार

किणी, तासवडे नाक्यांवर टोल दरवाढ
किणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) व तासवडे (जि. सातारा) येथील टोल नाक्यांवर चार रुपयांपासून तब्बल चौदा रुपयांची टोल दरवाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. आतापर्यंत दहावेळा टोल दरवाढ केली असून, वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सोसावा लागणार आहे.
तत्कालीन भाजप सरकारच्या काळात सुवर्ण चतुर्भुज योजनेअंतर्गत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. यामध्ये कागल ते शेंद्रे (सातारा) दरम्यानच्या १३३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर केले. यासाठी किणी व तासवडे (सातारा) येथे टोल नाके उभा करून २००५ पासून खासगी कंपनीद्वारे टोल वसुली केली जात आहे. त्यावेळी कार, जीपसाठी केवळ २१ रुपये टोल आकारला जात होता. तो आता ७० रुपयांप्रमाणे आकारला जाणार आहे.
ही टोल दरवाढ १ जुलै २०१४ पासून लागू करण्यात येणार असून, स्थानिक वाहनांना ३३ रुपये ऐवजी ३५ रुपये, कार-जीपसाठी ६६ रुपये ऐवजी ७० रुपये, हलक्या वाहनांसाठी ११५ रुपयांऐवजी १२२ रुपये, अवजड वाहनांसाठी २३० रुपये ऐवजी २४४ रुपयांची टोल आकारणी करण्यात येणार आहे. याचप्रमाणे तासवडे (सातारा) टोल नाक्यावरही टोल द्यावा लागणार असून, दोन्ही टोल नाके ओलांडताना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याने वाहनधारक आधीच हैराण झाले असून, या टोलदरवाढीमुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड सोसावा लागणार आहे. (वार्ताहर)