टोलप्रश्नी लवकरच सुनावणी
By Admin | Updated: July 2, 2014 00:41 IST2014-07-02T00:40:25+5:302014-07-02T00:41:03+5:30
युवराज नरवणकर : टोलनाक्यांवर गांधीगिरी, भडका उडवू नये

टोलप्रश्नी लवकरच सुनावणी
कोल्हापूर : शहरात राबविलेल्या एकात्मिक रस्ते प्रकल्पासाठी झालेला खर्च, कामाची सद्य:स्थिती, कराराचा भंग, आदी मुद्यांच्या आधारे सर्वाेच्च न्यायालयात सर्वपक्षीय कृती समितीतर्फे रस्त्यांच्या कामांबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आयआरबीने टोलवसुलीस परवानगी मिळावी, या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (दि.४) निर्णय अपेक्षित असून, लवकरच सुनावणी सुरू होईल, अशी माहिती अॅड. युवराज नरवणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
न्यायाधीश सुरियन जोसेफ व आर. एम. लोधा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २१ एप्रिलला टोलवसुलीच्या स्थगितीचा अंतरिम आदेश रद्द करण्यास तात्पुरता नकार देत प्रकल्पाची सद्य:स्थिती दर्शविणारा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मागील महिन्यातच कृती समिती व महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले होते. टोल वसुलीप्रश्नी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. ३१ जुलैपर्यंत टोलबाबत अंतिम निर्णय घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. यामुळे टोलचा सामना पुन्हा न्यायालयात रंगणार आहे.
दरम्यान, फुलेवाडी नाक्यावर आमदार चंद्रदीप नरके यांनी निवारा शेड हटविल्या. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दारात टोल विरोधी कृती समितीने लाक्षणिक उपोषण केले. टोल आंदोलनाची झळ वाढू नये यासाठी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ सुरू आहे. देईल त्यांच्याकडून पैसे असा वसुलीचा फंडा टोलनाक्यांवर अमलात आणला जात आहे. अपवाद वगळता कोल्हापुरातील एकही गाडी टोल देत नाही. ‘साहेब वीस रुपये’ म्हणत कर्मचारी गाडी अडवतात, मात्र, मिटल्यानंतर बघू, असे म्हणत कोल्हापूरकर टोल न देताच सुसाट निघून जातात. पोलीस प्रशासनानेही आम्ही फक्त नाक्यांच्या सुरक्षेसाठी आहोत, टोलप्रश्नी धमकावल्याची तक्रार आल्यास पोलिसी खाक्या दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले. नाक्यांवरील बाचाबाचीचे प्रकार कमी झाले आहेत. (प्रतिनिधी)