टोलप्रश्नी आज पुन्हा कोेल्हापुरात अघोषित बंद!

By Admin | Updated: June 9, 2014 01:13 IST2014-06-09T01:10:48+5:302014-06-09T01:13:18+5:30

शहर एकवटणार : ‘टोल देणार नाही’चा घुमणार नारा; सर्वपक्षीय महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Toll Question closed unannounced today in Kolhapur! | टोलप्रश्नी आज पुन्हा कोेल्हापुरात अघोषित बंद!

टोलप्रश्नी आज पुन्हा कोेल्हापुरात अघोषित बंद!

कोल्हापूर : ‘टोल आम्ही देणार नाही’चा नारा देत उद्या, सोमवारी अवघ्या कोल्हापूरकरांनी रस्त्यांवर उतरण्याची तयारी केली आहे. उद्या सकाळी दहा वाजता गांधी मैदानावरून निघणारा हा टोलविरोधी महामोर्चा दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकेल. आजी-माजी आमदार, खासदार, सर्व राजकीय संघटना, रिक्षांसह सर्वच वाहनचालक संघटना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, वकील, उद्योजक, सामाजिक संघटनांनी महामोर्चास जाहीर पाठिंबा दिला आहे. टोलविरोधात जनतेचा रोष असून, मागील दोन मोर्चांप्रमाणे यावेळीही कोल्हापूरकर सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून पाठिंबा देणार आहेत. यामुळे उद्या कोल्हापुरात अघोषित बंद असणार आहे.
सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने जिल्हा व शहरभर जागरण मेळावे घेऊन टोलविरोधी वातावरण तयार केले आहे. जानेवारीत टोलनाक्यांची राख करूनही पुन्हा ‘आयआरबी’ने टोल सुरू करण्याची तयारी सुरू केल्याने जनतेत टोलविरोधी प्रचंड रोष आहे. परिणामी, उद्याच्या मोर्चात उतरून कोल्हापूरकरांनी नाराजी व्यक्त
करण्याची तयारी केली आहे. या मोर्चात दोन खासदार, अर्धा डझन आमदार, अनेक माजी खासदार व आमदारांसह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आजी-माजी खासदार, आमदारांसह ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व गोविंद पानसरे, महापौर सुनीता राऊत, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखेंसह समितीचे पदाधिकारी व नगरसेवक महामोर्चाच्या अग्रभागी असणार आहेत. टोलविरोधातील अंतिम टोला देण्यासाठी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले आहे.
टोलविरोधी उद्या, सोमवारी निघणाऱ्या महामोर्चात कागल मतदारसंघासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते अग्रभागी असतील, अशी माहिती राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दरम्यान, या महामोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Toll Question closed unannounced today in Kolhapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.