अनधिकृत जाहिरातींच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक
By Admin | Updated: October 17, 2014 23:52 IST2014-10-17T23:42:23+5:302014-10-17T23:52:05+5:30
नागरिकांना महापालिकेचे आवाहन...तक्रारीची तत्काळ दखल

अनधिकृत जाहिरातींच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५च्या तरतुदीनुसार अवैध होर्डिंग व जाहिरातींची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांची असेल. अनधिकृत जाहिराती व होर्डिंगबाबत १८००२३३४५९८ व १८००२३३३५६८ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी तक्रार देण्याचे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे. तक्रार प्राप्त होताच इस्टेट विभागास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी यापूर्वीच दिले आहे. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे महापालिका क्षेत्रात लावलेल्या अवैध जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स, पोस्टर्स, तात्पुरत्या जाहिराती हटविण्याची संपूर्ण जबाबदारी विभागीय कार्यालयांची आहे. इस्टेट अधिकाऱ्याने महापालिकेच्या प्रचलित धोरणांप्रमाणे जाहिराती लावण्यास परवानगी देण्याची कार्यवाही करावयाची आहे. जाहिरात परवाना देतेवेळी परवाना क्रमांक व कालावधी नमूद करणे ही इस्टेट अधिकाऱ्याची जबाबदारी असेल. जाहिरातीचे परवाने व नागरिकांच्या अवैध जाहिरातींबाबत आलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी तत्काळ दोन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून शहर विद्रूपीकरणास आळा घालावा, असे महापालिकेने सूचित केले आहे. टोल फ्री क्रमांकांवरील तक्रारीची दखल इस्टेट अधिकारी तत्काळ घेतील.
काय आहे नियमावलीत
नागरिकांच्या टोल फ्री तक्रारीची तत्काळ दखल.
इस्टेट विभाग नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणार
अवैध जाहिरातींची विभागीय कार्यालयांची जबाबदारी.
प्रभागवार नागरिकांची समिती नेमणार
जाहिराती हटविण्यासाठी पोलिसांची मदत घेणार.