जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करणार

By Admin | Updated: April 12, 2015 00:57 IST2015-04-12T00:57:50+5:302015-04-12T00:57:50+5:30

चंद्रकांतदादांची घोषणा : मुंबईत आॅगस्टपासून विनाटोल प्रवेश

Toll free of Kolhapur from June | जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करणार

जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करणार

मुंबई : मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या चारचाकी वाहनांना (कार, जीप, एसटी व सिटी बसेस) टोलमुक्ती देण्याचा निर्णय येत्या आॅगस्टमध्ये घेण्यात येईल, तर कोल्हापूरकरांना ३१ मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्ती दिली जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जाहीर केले.
मुंबईतील एन्ट्री व एक्झिट पॉर्इंटवर टोल बंद करण्याबाबत वित्तीय व कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ही समिती ३० जुलैपर्यंत शासनाला अहवाल सादर करेल. त्यानंतर आॅगस्टपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल. येथून ८५ टक्के वाहने ही हलकी, चारचाकी वाहने असतात. टोलमुक्ती द्यायची म्हणजे कंत्राटदार कंपनीला २५०० ते तीन हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्याची तजवीज कशी करायची, याचे सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवित आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरचा फॉर्म्युला
कोल्हापूरमधील टोल बंद करायचा, तर आम्हाला ६०० कोटी रुपये द्या,
अशी मागणी कंत्राटदार आयआरबी कंपनीने केली आहे. सरकार आणि महापालिकेच्या म्हणण्यानुसार हा आकडा ३२५ कोटी रुपयांपर्यंत जातो. सुवर्णमध्य म्हणून ३५० कोटी रुपयांची रक्कम निश्चित झाली, तर ती रक्कम महापालिकेने आयआरबीला द्यावी लागेल. त्यासाठी राज्य शासन एवढी रक्कम कोल्हापूर महापालिकेला कर्ज वा अनुदान स्वरूपात देण्यास तयार आहे.महापालिकेने आयआरबीला एक लाख चौरस फुटांचा भूखंड दिला आहे. या भूखंडावर आयआरबीला वाढीव एफएसआय द्यावा, असाही एक प्रस्ताव आहे. त्यामुळे यासंदर्भात नेमलेली समिती याबाबतचा फॉर्म्युला निश्चित करेल आणि कोल्हापूरकरांना ३१ मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्तीची बातमी दिली जाईल, असे पाटील म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गांवरील नाक्यांवरही टोलमुक्ती
राष्ट्रीय महामार्गांवर हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा फॉर्म्युला केंद्र सरकार करीत आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या महाष्ट्रातील ४० नाक्यांवर हलक्या वाहनांवरील टोल बंद होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली आजच या संदर्भात चर्चा झाली. हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा राज्याचा पॅटर्न केंद्र सरकार स्वीकारणार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Toll free of Kolhapur from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.