अधिकाऱ्यांसह पोलिसांना केले टोर्गेट
By Admin | Updated: March 8, 2015 00:48 IST2015-03-08T00:40:27+5:302015-03-08T00:48:21+5:30
गाड्या, केमिकल प्लँट भक्षस्थानी : पोलिसांवरही जोरदार दगडफेक, अधिकाऱ्यांना ताब्यात देण्याची जमावाची मागणी

अधिकाऱ्यांसह पोलिसांना केले टोर्गेट
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीतील ‘एव्हीएच’ केमिकल्स प्रकल्पाच्या उभारणीपासूनच जनतेचा रोष होता. या प्रकल्पाविरोधात आंदोलन, कायदेशीर लढाईच्या माध्यमातून चळचळ उभी राहिली होती. आज, शनिवारी अधिकारी आल्याचे समजताच नागरिक प्रक्षुब्ध झाले. अधिकाऱ्यासह पोलिसांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
आज सकाळी एव्हीएच चंदगड तालुक्यातून हद्दपार झालाच पाहिजे, त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यास लोकांनी सुरुवात केली.
यावेळी लोकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्ही साध्या क्रशर मशीनला परवाना देताना वस्तुस्थितीची पाहणी करण्याकरिता येता, मग एव्हीएचसारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाला परवाना देताना ही पाहणी का केली नाही, असा जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्यांना काहीच उत्तर देता न आल्याने संतप्त जमाव त्यांच्या अंगावर धावून गेला. महिलांनी तर उपस्थित अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही त्या करीत होत्या. याचवेळी एव्हीएचकडे निघालेली कर्मचाऱ्यांची गाडी पाटणे फाटा येथे आली. त्यामुळे संतप्त जमावाने आपला मोर्चा तिकडे वळवला आणि ही गाडी पेटवून दिली. जमावाचा रूद्रावतार बघून अधिकाऱ्यांची गाळण उडाली. प्रदूषणचे नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस. एस. डोके यांचे ब्लडप्रेशर वाढल्यामुळे त्यांना पोलीस बंदोबस्तात तेथीलच एका इमारतीत नेण्यात आले. यावेळी लोकांनी अधिकाऱ्यांना ठेवलेल्या इमारतीवरही दगडफेक करत अधिकाऱ्यांना ताब्यात द्यावे ,अशी घोषणाबाजी करत या इमारतीवर चाल करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पाटणे फाटा येथे जमलेल्या संतप्त जमावाने एव्हीएच प्रकल्पाच्या दिशेने कूच केली. या प्रकल्पाकडे जाताना या मार्गावर कंपनीतील कर्मचारी राहत असलेल्या कार्यालयाची जाळपोळ केली. त्यानंतर जमाव कंपनीच्या कार्यस्थळावर पोहोचला. त्याने कंपनीच्या कार्यालयाला तसेच वाहनतळ असलेल्या शेडला आग लावली. यावेळी पोलिसांनी जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. काहींनी कंपनीच्या केमिकल प्लँटमध्ये घुसून सुरक्षा विभागाच्या कार्यालयावर हल्ला चढवला. त्यानंतर मुख्य प्लँटला पेटवून दिले. मुख्य प्लँट पेटवल्यानंतर आकाशात मोठे धुराचे लोट दिसत होते. जमावाने एव्हीएचवर हल्ला चढवल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी परसली आणि पाटणे फाटा येथे लाकांच्या झुंडीच्या झुंडी दाखल झाल्या. काहींनी पाटणे फाट्यावर ठिय्या मारला. जमावाने एव्हीएच कंपनीच्या कर्मचाऱ्यांची गाडी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन आलिशान गाड्या जाळल्या. प्रांताधिकारी कुणाल खेमनार यांची व पोलिसांच्या दोन व अन्य एक अशा तीन गाड्यांवर मोठी दगडफेक केली.
मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांमुळे परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर गेली. अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. प्रशासन व अधिकाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास नसल्याचे सांगत लोकांनी पोलिसांवरही जोरदार दगडफेक करण्यात केली. (प्रतिनिधी)