आजपासून बहरणार तरुणाईचा कलाविष्कार

By Admin | Updated: October 10, 2014 23:02 IST2014-10-10T22:15:54+5:302014-10-10T23:02:40+5:30

आजपासून प्रारंभ : जतच्या राजे रामराव महाविद्यालयाला यजमानपद

From today's youthful art inventions | आजपासून बहरणार तरुणाईचा कलाविष्कार

आजपासून बहरणार तरुणाईचा कलाविष्कार

कोल्हापूर : कलेच्या सप्तरंगांची चौफेर उधळण करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या ३४व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा प्रारंभ उद्या, शनिवारी होणार आहे. जत (जि. सांगली) येथील राजे रामराव महाविद्यालयात होणाऱ्या महोत्सवात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील २८० महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी लोकनृत्य, सुगम गायन अशा २८ प्रकारांमधून कलाविष्कार सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना राष्ट्रीय महोत्सवासाठी प्रवेश मिळवून देण्याच्यादृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. यावर्षीचा ३४व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे यजमानपद प्रथमच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालयाला मिळाले. त्यामुळे महाविद्यालयाने जय्यत तयारी केली आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, जतच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजित डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, महाविद्यालयात आज, शुक्रवारी महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू होती. रंगमंचांच्या तयारीवर अखेरचा हात फिरविण्यात येत होता. दुपारनंतर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील संघ, स्पर्धक येण्यास प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत संघ महोत्सवाच्या ठिकाणी येत होते. (प्रतिनिधी)

महोत्सवात आज...
मूकनाट्य, भारतीय समूहगीत, लघुनाटिका, लोककला, लोकनृत्य, सुगम गायन,
पाश्चिमात्य एकत्र गायन, वक्तृत्व,
वाद-विवाद, शास्त्रीय तालवाद्य आणि
सूरवाद्य, एकांकिका, पथनाट्य, स्पॉट फोटोग्राफी, रांगोळी, मातीकाम, स्थळचित्रण, कातरकाम या स्पर्धा होतील.

दुर्गम आणि दुष्काळी  परिसर असलेल्या जतमध्ये आमच्या महाविद्यालयाने स्थापनेची ४५ वर्षे पूर्ण केली आहेत.
येथील गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना तरुणाईचा कलाविष्कार पाहता यावा. तसेच त्यातून त्यांच्यामध्ये कलेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आमच्या महाविद्यालयात आयोजन केले आहे.
- प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर (राजे रामराव महाविद्यालय)

Web Title: From today's youthful art inventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.