योग्य करिअर निवडण्याची आज अंतिम संधी

By Admin | Updated: June 6, 2016 00:48 IST2016-06-06T00:20:19+5:302016-06-06T00:48:19+5:30

‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१६’- स्टॉलवर विद्यार्थी, पालकांनी घेतली माहिती; शिक्षणाची अद्ययावत माहिती एकाच छताखाली

Today's ultimate opportunity to choose the right career | योग्य करिअर निवडण्याची आज अंतिम संधी

योग्य करिअर निवडण्याची आज अंतिम संधी

कोल्हापूर : दहावी, बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, शिक्षणासाठी कोणत्या अभ्यासक्रमांची निवड करावी याबाबतचे सर्वोत्तम पर्याय आणि सर्वांगीण सल्ला देणाऱ्या ‘रोबोमेट प्लस’ प्रस्तुत ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर-२०१६’ला रविवारी विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी उसळली. प्रदर्शनाचा आज, सोमवारी समारोप होणार असल्याने ग्लोबल करिअरच्या अजोड संधी व नव्या दिशांची माहिती मिळविण्याची ही शेवटची संधी आहे.
येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनात कोल्हापूरसह राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत.
करिअरबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रदर्शनाला मोठी गर्दी होत आहे. रविवारची सुटी असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शनाला विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या आवडीनिवडीची विचारणा करून त्यांना संस्थेच्या विविध अभ्यासक्रम, त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती दिली जात आहे. काही स्टॉलधारकांनी त्यांना चित्रफितींद्वारे अभ्यासक्रमातील विविध संधी, संस्थेच्या परिसराची माहिती दिली. विद्यार्थी, पालकदेखील शंकांचे निरसन करून घेत होते. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थी, पालकांची गर्दी होती. विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजीस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, ग्राफिक्स, फॅशन व इंटेरिअर डिझायनिंग व रिटेल, आयटीआय, एव्हिएशन, मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, आदी क्षेत्रांतील विविध अभ्यासक्रमांची माहिती प्रदर्शनात उपलब्ध आहे. शिवाय सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने पालक, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, प्रदर्शनानिमित्त दिवसभर विविध सत्रांमध्ये मुलांच्या क्षमतेनुसार करिअर कसे निवडावे?, बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी, सध्याच्या स्थितीत तंत्रज्ञानामुळे सोपे झालेले शिक्षण आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विविध संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘रोबोमेट प्लस’ हे असून, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अ‍ॅँड इंजिनिअरिंग हे सहप्रायोजक आहेत, दि न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, ट्रिनिटी, शिवगंगा सुझुकी हे सहायक प्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Today's ultimate opportunity to choose the right career