स्वच्छतेची आज तिसरी मोहीम

By Admin | Updated: July 4, 2014 00:46 IST2014-07-04T00:45:06+5:302014-07-04T00:46:40+5:30

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेचा तिसरा टप्पा

Today's third campaign of cleanliness | स्वच्छतेची आज तिसरी मोहीम

स्वच्छतेची आज तिसरी मोहीम


कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या स्वच्छतेचा तिसरा टप्पा उद्या (शुक्रवारी) महापालिकेने हाती घेतला आहे. सकाळी सात वाजता महापालिकेचे सर्व विभागांतील किमान हजारहून अधिक कर्मचारी एकाचवेळी रंकाळा स्वच्छतेसाठी झटणार आहेत. अस्वच्छतेच्या गर्तेतून रंकाळ्याला बाहेर काढण्यासाठी महापालिकेसह सेवाभावी संस्थांचे हात राबणार आहेत. या मोहिमेसाठी सेवाभावी संस्थांसह कोल्हापूरकरांनी पुढे यावे, असे आवाहन महापौर सुनीता राऊत यांनी केले आहे.
रंकाळ्याच्या बाह्य विद्रुपीकरणाबरोबरच आता रंकाळ्याचे पाणीही मैलायुक्त बनल्याने हा ऐतिहासिक तलाव सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. तलावाची तटबंदीही तीन ठीकाणी मोठ्या प्रमाणात ठासळली आहे. याच्या दुरुस्तीकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने ठासळलेला भाग आजही जैसे थे अवस्थेत आहे. त्यातच रंकाळ्याच्या मैलायुक्त पाण्यामुळे दरवर्षी विषारी जलपर्णीचा वेढा पडतो. यावर उपाय म्हणून मिसळणारे सांडपाणी उद्यापासून दुधाळी नाल्यात सोडले जाणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
स्वच्छता मोहिमेबरोबरच रंकाळ्याच्या डागडुजीसह ‘मास्टर प्लॅन’ करून नियमित स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी. रंकाळा स्वच्छता मोहीम एक दिवसासाठी न राहता कायमस्वरूपी राबवावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत असताना महापौर राऊत यांनी घोषणा केल्याप्रमाणे ४५ दिवसांनंतर पुन्हा रंकाळा स्वच्छतेसाठी हाक दिली आहे. सकाळी रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्यांनी पहिल्या दोन स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. रंकाळा उद्यान, पदपथ, बगीचा, बाजूचा रस्ता, झाडी, कठडे, आसनव्यवस्था साफ केली. झाडा-झुडपांभोवती औषध फवारणी करण्यात आली. पदपथावर उगवलेली खुरटी वनस्पती साफ करण्यात आली होती. याच पद्धतीने तिसऱ्यांदा मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Today's third campaign of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.