विद्यापीठात आजपासून टॅलेंट मेळावा
By Admin | Updated: February 20, 2015 23:30 IST2015-02-20T23:04:09+5:302015-02-20T23:30:57+5:30
उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत व लेखी परीक्षाही या ठिकाणी घेतली जाणार आहे.

विद्यापीठात आजपासून टॅलेंट मेळावा
कोल्हापूर : देशभरातील नामवंत कंपन्यांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. तर अनेक कौशल्यप्राप्त युवक माहिती, मार्गदर्शनाअभावी रोजगार मिळवू शकत नाहीत. अशा कंपन्या व युवकांची भेट घालून देणे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, याकरीता टाईम इन्स्टिट्यूटच्यावतीने आज, शनिवारपासून दोन दिवसीय टॅलेंट मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा वि. स. खांडेकर भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे. या टॅलेंट मेळाव्याचे उद्घाटन अमेरिकेतील भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते व कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ‘रोटरी’चे गव्हर्नर गणेश भट (धारवाड), केंद्रीय उद्योग मंत्रालय (निमस्मी) हैदराबादचे संचालक सी. चंद्रशेखर रेड्डी यांच्या उपस्थितीत होणार आहे.हा टॅलेंट मेळाव्यात बेरोजगार युवकांची नोंदणी करून प्रत्येक उमेदवाराला रोजगार किंवा उद्योगाची संधी मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत व लेखी परीक्षाही या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर, पुण्याच्या डेक्कन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संजय झोपे यांचे पहिल्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी डॉ. बी. एम. हिर्डेकर, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे यांचे व्याख्यान होणार आहे. या मेळाव्यासाठी राजेंद्र बेंद्रीकर-शिंदे, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय ककडे, एन. जी. कामत, ‘रोटरी’चे संजय सातपुते, बी. वाय. कडोलकर, सुरेंद्र जैन, भरत पाटील, एम. वाय. पाटील कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)