आज प्रचाराचा सुपर संडे
By Admin | Updated: October 12, 2014 01:06 IST2014-10-12T01:04:43+5:302014-10-12T01:06:34+5:30
विधानसभा रणांगण : उमेदवार रविवारची संधी साधणार; प्रचारफेऱ्यांनी जिल्हा ढवळणार

आज प्रचाराचा सुपर संडे
कोेल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्रत्यक्ष मतदानाची तारीख जवळ आल्याने सर्वत्र प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. या तोफा दोन दिवसांत थंडावणार आहेत. त्यामुळे उद्या, रविवारच्या सुटीची नामी संधी साधण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून नियोजन करण्यात आले आहे.
पक्षनेत्यांच्या जाहीर सभा, कोपरा सभा, मेळावे, बैठका, पदयात्रा, घर ते घर प्रचार, प्रचाररथ, पथनाट्ये या माध्यमांतून सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या उमेदवारांच्या प्रचारात त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आहे. उद्या, रविवार सुटीचा दिवस असल्याने सर्व लोक घरात भेटणार हे गृहीत धरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, जनसुराज्य शक्ती आघाडी यांसह विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी ही नामी संधी साधण्याचे नियोजन केले आहे.
शक्तिप्रदर्शन करीत तसेच घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न राहणार आहे. मतदानपूर्व हा एकच रविवार हातात असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत आपले चिन्ह व आपली ओळख कशी पोहोचविता येईल, याकडे सर्वांचा कटाक्ष आहे. (प्रतिनिधी)