आजऱ्यात आजपासून ‘श्रमुद’चे राज्य अधिवेशन
By Admin | Updated: December 26, 2014 00:44 IST2014-12-26T00:35:05+5:302014-12-26T00:44:50+5:30
१८ वे अधिवेशन : पाचशे कार्यकर्ते सहभागी

आजऱ्यात आजपासून ‘श्रमुद’चे राज्य अधिवेशन
आजरा : चित्रानगर, आजरा येथे आयोजित श्रमिक मुक्ती दलाच्या १८ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनास उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून, अधिवेशनात १२ जिल्ह्यांतील सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांनी दिली.
दुपारी १२ वाजता येथील पंचायत समिती कार्यालयापासून अधिवेशन स्थळापर्यंत महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांची बैलगाडीतून मिरवणूक काढली जाणार आहे. दुपारी दोन वाजता ध्वजारोहण व उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थान वाहरू सोनावणे भूषवतील.
दुपारी चार वाजता होणाऱ्या पहिल्या सत्रात ‘श्रमुद’च्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या धरणग्रस्त, पवनचक्की, सेझ, जातिअंताची लढाई, आदी विभागवार चळवळींचा आढावा प्रमुख कार्यकर्ते घेणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, लातूर व औरंगाबाद, आदी जिल्ह्यांतील सुमारे ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)