भारतीय वायुसेनेचा आज वाढदिवस
By Admin | Updated: October 8, 2014 00:30 IST2014-10-08T00:22:21+5:302014-10-08T00:30:53+5:30
मुरलीधर देसाई : माजी वायुसैनिकांना पेन्शन अथवा मानधन सुरू करावे

भारतीय वायुसेनेचा आज वाढदिवस
कोल्हापूर : भारतीय वायुसेनेला उद्या, बुधवारी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय वायुसेनेने येणाऱ्या सातव्या पे-कमिशनमध्ये माजी वायुसैनिकांबरोबर ज्यांनी दहा वर्षे नोकरी केली आहे, ज्यांना पेन्शन नाही, अशांसाठी पेन्शन अथवा मानधन तरी सुरू करावे.
आता सातव्या वित्त आयोगाने तरुण पिढी संरक्षण खात्याकडे कशी आकृष्ट होईल, याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा. भारतीय वायुसेनेत पायलट व तांत्रिक अधिकाऱ्यांची भरती तत्काळ करणे गरजेचे आहे. देश मजबुतीसाठी सुरक्षा सक्षम असणे गरजेचे आहे, असे वायुसेनेच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील भारतीय वायुसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर दादोजीराव देसाई यांनी वायुसेनेचे महत्त्व पत्रकाद्वारे सांगितले आहे.
पत्रकात म्हटले आहे , दुसऱ्या महायुद्धात १९४२ मध्ये इंग्लंड आणि जर्मनीने विमानांचा वापर करून जगाला चकित करून टाकले. त्यावेळी जगाला हवाईदलाचे महत्त्व कळाले. ज्या देशाचे हवाईदल मजबूत, त्या देशात युद्ध करण्याची ताकद असेल. त्या वेळेपासून प्रत्येक देश आपले हवाईदल सज्ज करू लागले. भारतीय वायुदल अजून सक्षम होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान तसेच आधुनिक विमाने व शस्त्रास्त्रांने भारतीय वायुदल आजही मागेच आहे, असे म्हणावे लागेल.