‘लोकमत’चा आज वर्धापनदिन सोहळा

By Admin | Updated: August 20, 2015 00:51 IST2015-08-20T00:51:45+5:302015-08-20T00:51:45+5:30

स्नेहमेळाव्याचे आयोजन : ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ विशेषांकाचे उत्स्फूर्त स्वागत

Today's anniversary celebration of Lokmat is today | ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन सोहळा

‘लोकमत’चा आज वर्धापनदिन सोहळा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या समाजजीवनाचे महत्त्वाचे अंग बनलेल्या ‘लोकमत’चा आज, गुरुवारी अकरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महापौर वैशाली डकरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांच्या हस्ते होणार असून, यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित असतील.वर्धापनदिनानिमित्तचा विशेषांक सकाळी साडेनऊ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केला जाणार आहे. सायंकाळी वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होईल. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. थेट पाईपलाईन, हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, शिवाजी विद्यापीठ, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, आदी प्रश्नांवर ‘आता बस्स’च्या माध्यमातून ‘लोकमत’ने परखड भूमिका घेत लोकप्रतिनिधी व शासनाला जागे केले. त्यामुळे वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. यातील बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाली. काहींची सोडवणूक झाली. सडेतोड बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविते. लोकभावना आणि लोकरंजन यांचा मेळ घालीत ‘लोकमत’ कोल्हापूरचे एक सर्वसमावेशक व्यापक व्यासपीठ बनले आहे. ते असंख्य वाचकांचे आहे. तसेच ‘लोकमत’वर निर्व्याज प्रेम करणाऱ्यांचे आहे. पत्रकारितेची मूल्ये जपतानाच समाजातील बंधुभाव वाढीस लागावा, असा ‘लोकमत’चा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे वाचकांकडून ‘लोकमत’ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याची शिदोरी घेऊनच ‘लोकमत’ हा वर्धापनदिन सोहळा साजरा करीत आहे. (प्रतिनिधी)

विशेषांकाचे उत्स्फूर्त स्वागत
वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोल्हापूरकरांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी तेथे आपले पाय घट्ट रोवले आहेत. कोल्हापूरची माणसे जगभरात आहेत. त्यांची या विशेषांकाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने ओळख करून दिली आहे. हा विशेषांक बुधवारपासून वाचकांच्या भेटीला आला आहे. याचे वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. काहींनी विशेषांकातील लेख व्हॉट्स-अ‍ॅप, फेसबुकवर शेअर केले आहेत.

स्नेहमेळाव्याची वेळ, स्थळ
वेळ : आज, गुरुवारी, सायंकाळी ५ ते रात्री ८
स्थळ : धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर.

Web Title: Today's anniversary celebration of Lokmat is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.