आज संप; कामकाज ठप्प होणार

By Admin | Updated: September 1, 2015 22:45 IST2015-09-01T22:45:35+5:302015-09-01T22:45:35+5:30

शाळा बंद राहणार : अधिकारी कामावर अन् कर्मचारी संपावर

Today; Work will be postponed | आज संप; कामकाज ठप्प होणार

आज संप; कामकाज ठप्प होणार

कोल्हापूर : पाच दिवसांचा आठवडा करावा, रिक्त जागा भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, यांसह विविध ३० मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात आज, बुधवारी शासकीय विभागातील सव्वा लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. बस आणि रेल्वे कर्मचारीवगळता सर्वच विभागांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने शासकीय कामकाज ठप्प होणार आहे. ‘अधिकारी कामावर आणि कर्मचारी संपावर’ असे चित्र राहणार आहेत.
मंगळवारी दिवसभर सर्वच कार्यालयांतील कर्मचारी अधिकाधिक कर्मचारी संपात सहभागी व्हावेत, यासाठी प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवरून संपर्क साधून, एसएमएस, व्हॉटस् अ‍ॅप, मॅसेज करून आवाहन केले. शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संघटनांनी संपासंबंधी जागृती केली आहे. शिक्षण, आरोग्यसह सर्वच महत्त्वाच्या विभागांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे सार्वजनिक सेवा ठप्प होणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. शाळा सुरू मात्र शिक्षक नाहीत, असे चित्र राहणार आहे. शिक्षक संघटनांनी शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले आहे; परंतु, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणीही संपात सहभागी होऊ नये, शाळा सुरू ठेवाव्यात, असा आदेश काढला आहेत.बँकांतील, विमा, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग या विभागांतील कर्मचारीही संपात सहभागी होणार असल्यामुळे ‘अत्यावश्यक सेवा’ही कोलमडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या बापूसाहेब कुलकर्णी यांच्या लिपिकवर्गीय संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. लिपिकवर्गीय कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
या संपात सहभागी होणारे कर्मचारी आज, बुधवारी सकाळी दहा वाजता ‘काम बंद’ करून टाऊन हॉलमध्ये एकत्रित जमणार आहेत. त्यानंतर तेथून आपल्या विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन महानगरपालिका, बिंदू चौकमार्गे मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचा समारोप खासबाग मैदानाजवळ होणार असून, समारोपाच्या सभेत संघटनांचे अध्यक्ष, संघटनेचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघनेचे पदाधिकारी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, सीपीआर येथे रात्री मध्यवर्ती संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शासनाने संपात सहभागी होऊ नका, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळा सुरू ठेवण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुरू राहतील. - सुभाष चौगुले,  शिक्षणाधिकारी (प्राथमिक)


शाळा बंद ठेवू नये, माध्यमिक शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे आज माध्यमिक शाळा बंद राहणार नाहीत.- ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: Today; Work will be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.