बालमंच सदस्यांना आज ‘मत्स्य दुनिये’ची सफर
By Admin | Updated: December 12, 2014 00:35 IST2014-12-12T00:25:35+5:302014-12-12T00:35:44+5:30
पाय, हात असणारा आणि सरड्यासारखा दिसणारा ‘अॅक्सोलॉट’ प्रजातीचा मासा, आफ्रिकन लेग फिश, स्टिंग रे, अॅलिगेटर गार, रेड नोज शोवेल यांसारख्या दुर्मीळ प्रजाती

बालमंच सदस्यांना आज ‘मत्स्य दुनिये’ची सफर
कोल्हापूर : पाय, हात असणारा आणि सरड्यासारखा दिसणारा ‘अॅक्सोलॉट’ प्रजातीचा मासा, आफ्रिकन लेग फिश, स्टिंग रे, अॅलिगेटर गार, रेड नोज शोवेल यांसारख्या दुर्मीळ प्रजाती असलेल्या माशांच्या दुनियेची सफर उद्या, शुक्रवारी लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांना घडणार आहे. लोकमत बालविकास मंच व अॅक्वा लाईफ यांच्या विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साईक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या ‘अॅक्वा लाईफ’ प्रदर्शनात बालमंचच्या सभासदांना मोफत प्रवेश मिळणार आहे. मत्स्य दुनियेची ही सफर अनुभवण्यासाठी बालविकास मंचच्या सदस्यांनी सोबत आपले ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. त्यांच्यासमवेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रवेश फी भरावी लागणार आहे.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना यकू पिटा, पर्ल अॅरवाना, स्पॉटेड कॅट फिटा, रिड स्नेक या दुर्मीळ प्रजाती पाहावयास मिळणार आहेत. यामधील अॅक्सोलॉट हा मासा सरड्यासारखा दिसतो. तो पाण्यात तरंगतोसुद्धा आणि पाण्यात चालतोसुद्धा. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पाण्यातील कीटक खातो. यासह प्रजननकाळात त्याच्या कानांवरच्या पडद्यांचा रंग बदलत असतो.
स्टिंग रे हा तळाला सरपटत असणारा मासाही या प्रदर्शनात आहे. याशिवाय साठ ते सत्तर मोठे अॅक्वेरियम असून त्यामध्ये दोनशेहून अधिक माशांच्या प्रजाती आणि एक्झॉटिक प्लांटस् आहेत. शाकाहारी व मांसाहारी असे अनेक दुर्मिळ मासे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
हे प्रदर्शन उद्या, शुक्रवारी फक्त लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांसाठी मोफत खुले राहणार आहे. मत्स्य दुनियेची ही अनोखी सफर अनुभवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालयाशी किंवा बालविकास मंचचे संयोजक नितीन रणदिवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)