कोल्हापुरात आज ‘मराठा वादळ’
By Admin | Updated: October 15, 2016 01:02 IST2016-10-15T01:02:41+5:302016-10-15T01:02:41+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चा : विक्रम मोडीत काढणार; सीमावासीयांचाही मोठा सहभाग

कोल्हापुरात आज ‘मराठा वादळ’
कोल्हापूर : ‘एक मराठा - लाख मराठा’ या हाकेला साद देत संपूर्ण राज्यभर निघत असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाची ठिणगी पडलेल्या कोल्हापुरातही आज, शनिवारी निघणाऱ्या महामोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. हा मोर्चा कोल्हापुरात निघत असला तरीही या मोर्चात कोल्हापूर परिक्षेत्रासह कोकण, कर्नाटक राज्यातील मराठा बांधव सहभागी होत आहेत.
कोल्हापुरातील आजपर्यंतचे सर्व मोर्चांचे विक्रम मोडीत काढणारा हा मोर्चा ठरणार आहे. त्यादृष्टीने संयोजन समितीने तयारी केली आहे. त्यामुळेच या मोर्चाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पोलिस कुमकही आली आहे. चौकाचौकांत भगवे ध्वज, भव्य फलक उभारल्याने या मूक मोर्चाकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.
मोर्चाला गांधी मैदान येथून सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार असला तरीही शहराच्या नऊ प्रवेशद्वारांतून चारही दिशांनी मोर्चा एकाच वेळी ऐतिहासिक दसरा चौकात येऊन धडकणार आहे. कोल्हापूरच्या संस्कृतीला राजर्षी छत्रपती शाहूंच्या जातिपातींच्या एकोप्याचा वारसा असल्याने त्याचे दर्शन या मोर्चातून साऱ्यांसमोर येत आहे. मुस्लिमसह सर्व समाजबांधवांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर करून सहभागी व विविध मार्गांनी योगदान देणार असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठा आरक्षणाबाबत कोल्हापुरात झालेल्या ‘गोलमेज’ परिषदेतून या मोर्चाची ठिणगी पडली. त्याचवेळी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने लोकांच्या मनातील खदखद बाहेर पडली. त्या कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी कोल्हापुरात पहिली बैठक टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली आणि मोर्चाच्या तयारीला वेग आला. गेल्या ७० वर्षांत सर्व क्षेत्रांत मराठा समाजाची अधोगती होत आहे, त्याला उभारी देण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी सारा मराठा समाज एकवटला. ‘लई केलं इतरांसाठी, आता फक्त मराठा समाजासाठी’ या घोषणेने मराठा समाजाच्या कोल्हापुरात पडलेल्या ठिणगीनंतर कोपर्डीतील घटनेमुळे राज्यभर भडका उडाला अन् राजकीय नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा मराठा समाज एकवटून स्वत:च्या लढ्यासाठी बाहेर पडला. त्यामुळे राजकीय नेत्यांना धडकी भरली आहे. आज, शनिवारी होणाऱ्या मोर्चात किमान ३५ लाखांहून अधिक नागरिक हक्कासाठी मूक मोर्चात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात मराठ्यांचा भगवा ध्वज मानाने घरावर आणि वाहनांवर फडफडत असल्याचे चित्र दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर मोर्चातील मावळे व रणरागिणी तसेच पोलिस प्रशासनाने रंगीत तालीम घेऊन सज्ज असल्याचे दाखविले. (प्रतिनिधी)
मुस्लिम बांधवांचे मोलाचे सहकार्य
सामाजिक समतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या गेलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक
मराठा क्रांती मोर्चात प्रत्येकजण आपला सहभाग नोंदवत आहेत. विविध जाती-धर्माचे लोक मोर्चाला सहकार्य करत असल्याचे चित्र आहे. मुस्लिम समाज तर या सगळ्यात आघाडीवर राहिला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुस्लिम बांधवांनी पार्किंगची व्यवस्था सांभाळली आहे. यासाठी त्यांनी पार्किंग कमिटी नेमली आहे. त्यात सलीम कुरणे, सलीम अत्तार, इरफान मुजावर, वाहिद मुजावर, जहाँगीर मेस्त्री, हम्जेखान सिंदी, उस्तम सैय्यद, शकील नगारजी, इर्शाद टिनमेकर, कादर मलबारी, गणी आजरेकर यांचा समावेश आहे. सुमारे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते जागेचे सपाटीकरण, कच्चे रस्ते, मार्किंग करण्यापासून झटत होते. प्रत्यक्ष आज, शनिवारीही ही व्यवस्था मुस्लिम कार्यकर्तेच सांभाळणार आहेत.
गांधी मैदान, ताराराणी चौकातून प्रारंभ
मोर्चा चारही दिशांनी येऊन दसरा चौकात एकाच वेळी धडकणार आहे. गांधी मैदान येथे सकाळी ११ वाजता छत्रपती जिजाऊ, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून मूक मोर्चाला प्रारंभ होणार आहे. मोर्चाच्या प्रारंभी विविध गणवेशांतील दहा युवती, पाठोपाठ महिला व युवक, त्यानंतर पाठोपाठ पुरुष व राजकीय मंडळी असा सहभाग राहणार आहे.
पेठापेठांत फडकले भगवे
मोर्चाचा माहोल शिगेला पोहोचला आहे. या माहोलात लहान-लहान मुलेही सहभागी झाली आहेत. शुक्रवारी शहराच्या पेठा-पेठात ही लहान मुले भगवे ध्वज फडकावत होते. अनेक तरुण मोटारसायकलवर भगवे ध्वज लावून फेऱ्या मारत होते. एकूणच कोल्हापूरचे समाजमन मोर्चामुळे ढवळून गेले आहे.