डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात आज निषेध दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:44+5:302021-06-18T04:16:44+5:30
कोल्हापूर : ‘‘वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा’’ या मागणीकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज शुक्रवारी १८ ...

डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात आज निषेध दिन
कोल्हापूर : ‘‘वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा’’ या मागणीकरिता इंडियन मेडिकल असोसिएशनकडून आज शुक्रवारी १८ जून रोजी राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात येणार आहे. ही माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), होमिओपॅथी असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए)या संघटनांचे सदस्यही या निषेध दिनामध्ये सहभागी होणार आहेत.
डॉ. आशा जाधव म्हणाल्या, ‘‘या आजाराचा सर्वसाधारण जागतिक मृत्यूदर २.१६ टक्के आहे. भारतात हा मृत्यूदर १.२७ टक्के आहे. म्हणजे जागतिक सरासरीपेक्षा भारतामध्ये कोविडमुळे बळी पडलेल्यांची संख्या नक्कीच कमी आहे. यामध्ये खासगी डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये विविध राज्यात डाॅक्टर आणि रुग्णालयांवर हल्ले होण्याच्या १५ घटना घडल्या आहेत. यात वित्तहानीही झाली आहे. म्हणून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या वेळी केएमएचे सचिव डॉ. किरण दोशी, खजनिस डॉ. ए. बी. पाटील, सल्लागार समिती सदस्य डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. नीता नरके, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ. शीतल देशपांडे, डॉ. पद्मराज पाटील, डॉ. निरूपमा सखदेव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
चौकट
काळ्या फिती, निषेधाचे फलक
म्हणून या हल्ल्यांच्या विरोधात शुक्रवारी जिल्ह्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने संपूर्ण कामकाज काळ्या फिती लावून करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. रुग्णालयात निषेधाचे फलक लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण ४५ हजार आयएमएचे सदस्य यात सहभागी होणार आहेत, असे डॉ. आशा जाधव म्हणाल्या.