सिंधुदुर्गात कॉँग्रेसचे आज गोदाम खाली करा आंदोलन; जमावबंदी
By Admin | Updated: May 27, 2015 01:19 IST2015-05-27T01:09:27+5:302015-05-27T01:19:46+5:30
गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सुमारे २४ हजार क्विंटल भात गोडावूनमध्ये असल्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आले नाही

सिंधुदुर्गात कॉँग्रेसचे आज गोदाम खाली करा आंदोलन; जमावबंदी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा काँग्रेसने ‘भात गोडावूनखाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी कठोर पावले उचलून संबंधित २२ गोडावून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सुमारे २४ हजार क्विंटल भात गोडावूनमध्ये असल्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना भात विकून टाकले. याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने १९ जानेवारीला धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करतो, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्याची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.
त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व आमदार नीतेश राणे यांनी २७ मे रोजी कणकवली तालुक्यातील जानवली गोडावून, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी व सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गोडावून या तीन गोडावूनमध्ये ‘भात गोडावून खाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.
त्यानुसार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील २२ गोडावूनच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात १९७३चे कलम १४४ नुसार जमावबंदी लागू केली आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ही जमावबंदी २७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २८ मे रोजीपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेसच्यावतीने ‘भात गोडावून खाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन प्रमुख ई. रवींद्रन यांनी आपल्या अधिकारात संबंधित गोडावून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व आमदार नीतेश राणे कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.