आज मैत्रीचा उत्सव, बँड, भेटवस्तूंची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:35+5:302021-08-01T04:22:35+5:30
कोल्हापूर : ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर मनात रुजवायची असते, काहीही नातं नसताना जे नातं तयार ...

आज मैत्रीचा उत्सव, बँड, भेटवस्तूंची रेलचेल
कोल्हापूर : ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर मनात रुजवायची असते, काहीही नातं नसताना जे नातं तयार होतं, एकमेकांच्या संकटात जी धावून जाते, आई-वडिलांना माहिती नसतात ती गुपितं जिला माहिती असतात असा मैत्रीचा दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे आज रविवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त फ्रेंडशिप बँड, रिंग, ग्रिटिंग आणि आकर्षक भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा महापूर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेला हा दिवस अनेकांनी पूरग्रस्तांना मदत करून साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा होतो. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा, महाविद्यालये बंद असल्याने नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटण्यावर मर्यादा येत असल्या तरी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतोच. सध्या कोरोना आणि महापूर अशा दोन संकटांचा कोल्हापूरकरांना सामना करावा लागत आहे. महापुराने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत येत आहे. अशा काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज असल्याने तरुणाईने हा दिवस विधायकरित्या साजरा करत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
--
सहस्त्रम बँन्डचा लाईव्ह कार्यक्रम
फ्रेंडशिप डे निमित्त आनंद इव्हेंटस कंपनीतर्फे आज रविवारी दुपारी ४ वाजता सहस्त्रम बँन्ड या वाद्यवृंदासह गाण्यांचा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे सादर करण्यात येणार आहे. यात तरुणाईला आवडतील अशी गाणी सादर करण्यात येणार आहे. संस्थेच्यावतीने दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रमाने हा दिवस साजरा केला जाताे. तरी तरुणाईने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरदार पाटील यांनी केले आहे.
---
फोटो नं ३१०७२०२१-कोल-फ्रेंडशिप डे
ओळ : आज रविवारी साजरा होणाऱ्या फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला (शनिवारी) कोल्हापुरातील राजारामपुरी येथील दुकानांमध्ये आकर्षक बँडसह भेटवस्तूंची रेलचेल होती. यावेळी मुलींनी एकमेकांच्या हातात बँन्ड बांधून आधीच या दिवसाचा आनंद लुटला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--