बँक आॅफ इंडियाच्या दारात आज निदर्शन

By Admin | Updated: November 12, 2014 00:53 IST2014-11-12T00:51:36+5:302014-11-12T00:53:57+5:30

क्लिअरिंगचा फटका बसणार : को-आॅप. बँका संपात नाहीत े

Today at the bank of India's doorstep demonstrate | बँक आॅफ इंडियाच्या दारात आज निदर्शन

बँक आॅफ इंडियाच्या दारात आज निदर्शन

कसबा बावडा : देशभरातील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी उद्या, बुधवारी एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. या संपाचाच एक भाग म्हणून शहरातील सर्व बँक कर्मचारी सकाळी ११ वाजता बँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेच्या दारात जोरदार निदर्शने करणार आहेत. दरम्यान, या संपात सहकारी बँकांचा सहभाग नसतानाही त्यांना क्लिअरिंगचा फटका बसणार आहे.
२५ टक्के पगारवाढ करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, कॉर्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करावी, नवीन नोकर भरती करावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या पाच कामगार संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होणार असल्याने ग्राहकांनी बँकिंग सुविधेच्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे निवेदनही संघटनेकडून प्रसिद्धीस दिले आहे.
केंद्रातील मोदी सरकार आमच्या मागण्या मान्य करेल, असा आशावाद विविध बँक संघटनांना होता; परंतु संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने या संपाची हाक देण्यात आली आहे. उद्या सर्व बँकांचे कर्मचारी बँक आॅफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर जमून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करणार आहेत. संघटनेचे राजाराम परीट, एकनाथ औंधकर, अशोक चौगले, शाम बापट, आदींच्या नेतृत्त्वाखाली ही निदर्शने होणार आहेत.
दरम्यान, या संपात को-आॅप. बँका सहभागी नाहीत. मात्र, त्यांना या संपामुळे क्लिअरिंगचा फटका बसणार आहे. कारण बहुतेक को-आॅप. बँका नवीन ‘सीटीएस’ क्लिअरिंग सिस्टममुळे क्लिअरिंग हाऊसचे थेट मेंबर नाहीत. त्या कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीयकृत बँकांच्या ‘सबमेंबर’ असून, त्या बँकांमार्फतच त्या आपल्या क्लिअरिंगचे व्यवहार पूर्ण करतात. मात्र, सर्व राष्ट्रीयकृत बँका संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे को-आॅप. बँकांना संपात न उतरताही क्लिअरिंग व्यवहाराचा फटका बसणार आहे. कोल्हापुरातील को-आॅप. बँकांचे दररोज १० ते १५ कोटींचे क्लिअरिंग व्यवहार होतात. (प्रतिनिधी)

Web Title: Today at the bank of India's doorstep demonstrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.