आजपासून कायदा साक्षरता अभियान

By Admin | Updated: March 13, 2015 23:54 IST2015-03-13T22:51:55+5:302015-03-13T23:54:10+5:30

अनोखा उपक्रम : गोविंदराव पानसरे यांना वकिलांची कृतिशील आदरांजली

From today, Act Literacy Campaign | आजपासून कायदा साक्षरता अभियान

आजपासून कायदा साक्षरता अभियान

सांगली : पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांनी समाजजागृतीसह नागरिक कायद्याचे साक्षर व्हावेत यासाठी परिश्रम घेतले. पानसरे यांना कृतिशील आदरांजली वाहण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीने येत्या शनिवारपासून वर्षभराकरिता ‘कॉ. गोविंद पानसरे कायदे साक्षरता अभियान’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत शहरातील सहा वकिलांची टीम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी गावा-गावात जाऊन तेथील ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला व साहाय्य करणार आहे.लोकशाहीप्रधान देशात कायद्याचे राज्य असले तरीही बहुतेकांना कायद्याची फारशी माहिती नसते. परिणामी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हे थांबविण्यासाठी नागरिक ‘कायदा साक्षर’ होणे महत्त्वाचे आहे. गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनाची हाक दिली व त्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबरीने त्यांना कायद्याबाबतही जागृत केले. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या कायद्याची माहिती सामान्यांना व्हावी, या उद्देशाने सांगली जिल्हा सुधार समितीने वर्षभर कायदा साक्षरतेचा जागर करण्याचे कार्य हाती घेतले आहे. या अभियानाचा कोठेही गाजावाजा करण्यात येणार नसून, प्रत्यक्ष कृतिशील कार्य करण्यावर वकिलांचा भर राहणार आहे. यानिमित्त आयोजित बैठकीमध्ये ग्रामस्थांना कायद्याची सोप्या भाषेत माहिती देण्यात येणार आहे. दिवाणी, फौजदारी, कामगार कायदे, ग्राहक संरक्षण कायदा, सामाजिक व महिलाविषयक कायदे याबाबत प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठीही संबंधितांना मोफत सल्ला व साहाय्य करण्यात येणार आहे. नुकताच भूसंपादनविषयी कायदा लोकसभेत मंजूर झाला असला तरी ज्या शेतकऱ्यांना या कायद्याला सामोरे जावे लागणार आहे, त्यांना या कायद्याची माहितीच नाही. कायद्याच्या त्रुटी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहेत. शनिवार, दि. १४ रोजी मिरज तालुक्यातील बिसूर येथून अभियानास प्रारंभ होत आहे. प्रत्येक शनिवारी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांची सोयीची वेळ पाहून कायदा जागर करण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानात अ‍ॅड. राहुल पाटील, अमित शिंदे, वैभव कदम, प्रियांका कस्तुरे, दीपक हेगडे, राहुल कांबळे हे युवा वकील सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे भविष्यकाळात विविध क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील कायदेशीर तज्ज्ञदेखील अभियानात सहभागी होण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)


गोविंद पानसरे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणार
सांगली जिल्हा सुधार समितीचा उपक्रम
बिसूर येथे आजपासून उपक्रमास प्रारंभ
शहरातील सहा वकिलांची टीम कार्यरत
प्रत्येक शनिवारी गावा-गावात मार्गदर्शन
ग्रामस्थांना कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला
नागरिकांना ‘कायदा साक्षर’ बनविण्यासाठी प्रयत्न
शेतकऱ्यासमोर भूसंपादन कायद्याच्या त्रुटीं मांडणार
इतर कायद्यांबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार
जनजागृती अभियान वर्षभर राबविणार

मार्गदर्शक पुस्तिका..
सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे सामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या ५० कायदेशीर तरतुदींची मार्गदर्शक पुस्तिका समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे.

सामान्य माणूस कायदा साक्षर होणे अत्यावश्यक होते. परंतु स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही तशी परिस्थिती नाही. यासाठीच काही युवा वकिलांनी कायदा साक्षरतेचे अभियान हाती घेतले आहे. वास्तविक ही एक चळवळच आहे.
- अ‍ॅड. राहुल पाटील, सांगली.

Web Title: From today, Act Literacy Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.