जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर तोबा गर्दी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:20+5:302021-09-14T04:28:20+5:30
आपले प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट व्हावी, उत्तम संवाद व्हावा, यासाठी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या दालनाचे ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर तोबा गर्दी..
आपले प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट व्हावी, उत्तम संवाद व्हावा, यासाठी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या दालनाचे दरवाजे खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली. प्रत्येकालाच आधी साहेबांसमोर जायचे असल्याने दालनाच्या दरवाजातच लोक उभे राहिले होते. अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कसे यावे, कसे बसावे याचा प्रोटोकॉल मोडीत काढत थेट जिल्हाधिकारी बसतात, त्या सोफ्यावर जाऊन बसले. तोबा गर्दी आणि कलकलाटाने शेवटी जिल्हाधिकारी रेखावार स्वत: दालनाबाहेर आले व लोकांना रांगेत उभे राहायला सांगितले.
सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी सकाळी साडेअकरा ते दोन ही वेळ अभ्यागत भेटीची आहे. पण सायंकाळचे सहा वाजून गेले तरी गर्दी हटलेली नव्हती. स्वत: जिल्हाधिकारी व गार्ड यांना जेवायला मिळालेले नाही. सुनावण्या सुरू असतानादेखील लोक दारात उभे राहून, वाकून बघत होते. जिल्हाधिकाऱ्यांचे गार्ड आणि शिपाई यांनी वारंवार सांगूनही लोक थांबत नव्हते. या गर्दीत महसूलच्या कर्मचाऱ्यांनाही साहेबांच्या सह्या घ्यायला आत जाता येईना, अशी स्थिती होती.
-----
कुपन किंवा चिठ्ठी द्यावी...
दालन खुले ठेवण्याचा उद्देश चांगला असला तरी गर्दीला शिस्त लावावी लागणार आहे. प्रथम येणाऱ्या व्यक्तींना नंबर किंवा त्यांच्या नावाची चिठ्ठी द्यायला हवी. आत गेलेला एक व्यक्ती किंवा शिष्टमंडळ बाहेर येईपर्यंत दुसऱ्यांना आत सोडायचे नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू असलेल्या प्रकरणांची गोपनीयतादेखील राहिली पाहिजे, अशी व्यवस्था लावली पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकारी बाहेर येतात तो दरवाजा बंद ठेवता येईल.
--
फोटो नं १३०९२०२१-कोल-जिल्हाधिकारी ०१,०२
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या दालनाचे दरवाजे खुले ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी अशी तोबा गर्दी झाली होती.
--