हद्दवाढीसाठी आताच योग्य वेळ
By Admin | Updated: June 12, 2016 01:38 IST2016-06-12T01:38:13+5:302016-06-12T01:38:13+5:30
समिती शुक्रवारपासून कोल्हापुरात : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अडचणींत वाढ

हद्दवाढीसाठी आताच योग्य वेळ
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाने नियुक्त केलेली समिती येत्या शुक्रवारी (दि. १७) कोल्हापुरात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. समितीचा दौरा निश्चित झाल्यामुळे हद्दवाढ होण्याची शक्यता तयार झाली आहे.
या समितीने निर्णय काहीही दिला तरी दोन्ही औद्योगिक वसाहती वगळून व शहरालगतची गावे समाविष्ट करून हद्दवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पालकमंत्री स्वत:च त्याबाबत फार आग्रही आहेत.
आताच आॅक्टोबरपूर्वी त्याबाबत काही ठोस निर्णय होण्याची गरज आहे. अन्यथा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तर पालकमंत्र्यांना राजकीयदृष्ट्याही याबाबत काही निर्णय घेणे शक्य होणार नाही. एकदा जिल्हा परिषद निवडणूक झाल्यावर मग मात्र हद्दवाढ करणे राजकीय व कायदेशीरदृष्ट्या फारच अडचणीचे होईल. जिल्हा परिषदेच्या सभागृहाचीही आता मुदत संपत असल्यामुळे फारसा विरोध होणार नाही.
नवे सभागृह आल्यावर हद्दवाढ करण्यास तीव्र विरोध होईल; कारण त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहाची पुनर्रचना होऊ शकते. त्याला निवडणुकीनंतर सहजासहजी कोण तयार होणार नाही.
पालकमंत्री पाटील यांनी स्वत: लक्ष घालून याबाबत नागरिकांची आग्रही मागणी विचारात घेऊन तत्काळ ठोस निर्णय होण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागातील दोन
तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली होती. ही समिती १७ व १८ रोजी कोल्हापूरला येऊन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा करून आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)