यंदाही ‘नो’ दणदणाट; ढोल,ताशांचा कडकडाट
By Admin | Updated: August 26, 2014 00:15 IST2014-08-25T23:56:20+5:302014-08-26T00:15:59+5:30
पारंपरिक वाद्यांना मागणी : आतापासूनच मंडळाकडून बुकिंग

यंदाही ‘नो’ दणदणाट; ढोल,ताशांचा कडकडाट
कोल्हापूर : आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करताना डॉल्बीच्या आवाजावर शासनाने गेल्या काही वर्षांपासून मर्यादा आणल्याने गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमू लागले आहेत. गणेशोत्सवाचे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठेत ढोल - ताशे-लेझीम ही पारंपरिक वाद्ये खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे तर गावात, गल्लीमध्ये ढोल-ताशांच्या सरावाने गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे.
डॉल्बीच्या आवाजावर घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे गणेशोत्सवात आता पारंपरिक वाद्यांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ढोल, ताशे, बँजो, बँड या पारंपरिक वाद्यांच्या सरावाने परिसर कडाडू लागले आहेत, तर काहीजणांनी आपले जुने ढोल, ताशे दुरुस्तीसाठी आणले आहेत. सायंकाळच्या वेळेत शहरातील पापाची तिकटी, ग्रामीण भागात जाऊन धनगरी ढोल, नाशिक ढोल, झांजपथक, बँजो, बँड यांची पाहणी करून आगाऊ रक्कम देऊन आतापासूनच मंडळांनी बुकिंग सुरू केले आहे.
मंडळांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक पथक ांनी बँजो, बँड, झांजपथक यासाठी सज्ज केले. माणसांची जुळवाजुळव करू लागले आहेत. काही पथकांनी आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे, यासाठी आपला खास पोशाखही तयार करून ठेवले आहेत, तर काहीजण ढोल-ताशे, स्पीकर रिपेरिंग करू लागलेत. प्रत्येक पथकात साधारण ५ ते १०० जणांपर्यंत माणसे असतात. कोल्हापुरातील काही मंडळांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून धनगरी ढोल, पारंपरिक वाद्ये मागविली. लक्ष्मीपुरी येथे ढोल-ताशे लेझीम खरेदीसाठी गर्दी होत आहे.