ठराव दाखलची वेळ, नावातील चुका भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:38+5:302021-09-17T04:30:38+5:30

कोल्हापूर : ठराव दाखल करण्यासाठी दिलेली वेळ न पाळणे, व्यक्ती, संस्थांसह गावांची नावे व्यवस्थित न लिहिणे, एकाच संस्थेचे दोन-दोन ...

Time to file a resolution, name errors | ठराव दाखलची वेळ, नावातील चुका भोवणार

ठराव दाखलची वेळ, नावातील चुका भोवणार

कोल्हापूर : ठराव दाखल करण्यासाठी दिलेली वेळ न पाळणे, व्यक्ती, संस्थांसह गावांची नावे व्यवस्थित न लिहिणे, एकाच संस्थेचे दोन-दोन ठराव, ऐनवेळी ठरावात केलेले बदल अशा कारणांनी प्रारूप मतदार यादीच्या हरकतींवर आलेल्या सुनावणीवेळी अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढवली. अंतिम मतदार यादी करण्यासाठी या चुका अक्षम्य असल्याने त्या ठरावधारकांच्या अंगलट येणार आहेत. तब्बल २३ संस्थांचे ठराव दुबार आले आहेत.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या ७३ हरकतींवर गुरुवारी विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी तब्बल आठ तास सुनावणी घेतली. याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून तो येत्या बुधवारी (दि. २२) जाहीर केला जाणार आहे. अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची पक्की मतदार यादी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाकडून ३ सप्टेंबरला ७ हजार ५९८ ठरावांची पडताळणी करून प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली. दाखल झालेल्या ९५ हरकतींपैकी मयत व्यक्तींचे ठराव बदलाचे अर्ज वगळून शिल्लक राहिलेले २३ दुबार ठराव आणि ५० इतर आक्षेप अशा ७३ हरकतींवर उपनिबंधक अरुण काकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा वाजता सुनावणी संपली. तब्बल आठ तास ही सुनावणी चालली. जिल्हा बँकेच्या प्रारूप यादीवरील सर्व हरकतींवर सुनावणी पूर्ण करण्यात आली. यात २३ संस्थांचे ठराव दुबार आले आहेत. मयत झाल्यामुळे नव्याने निवडून आलेल्यांनी ठराव दाखल केले आहेत. ठराव दिलेल्या वेळेत दाखल करणे आवश्यक असतानाही उशिरा दिल्याचे आढळले.

आता सुनावणीवर बुधवारी अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरला पक्की यादी जाहीर करून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी सुरू होणार असल्याची माहिती अरुण काकडे यांनी दिली.

Web Title: Time to file a resolution, name errors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.