एजंटांच्या सुळसुळाटामुळे सहायक कामगार आयुक्तांवर खुलासा करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:32+5:302021-07-01T04:17:32+5:30
कोल्हापूर : बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ देण्यावरून एजंटांचा सुळसुळाट झाल्याने आणि फसवणुकीचे प्रकार वाढल्याने सहायक कामगार आयुक्तांवर खुलासा ...

एजंटांच्या सुळसुळाटामुळे सहायक कामगार आयुक्तांवर खुलासा करण्याची वेळ
कोल्हापूर : बांधकाम कामगारांची नोंदणी व लाभ देण्यावरून एजंटांचा सुळसुळाट झाल्याने आणि फसवणुकीचे प्रकार वाढल्याने सहायक कामगार आयुक्तांवर खुलासा करण्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. बांधकाम कामगार नोंंदणी व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीनेच रितसर प्रक्रियेनुसारच होत असून ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारले जात नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
१५०० रुपये कोविड अनुदानासह कल्याणकारी महामंडळ सक्रिय झाल्याने बांधकाम कामगारांना शासनाकडून रोख व वस्तू स्वरूपात लाभ दिला जात आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडे रितसर नाेंदणी असलेल्यांनाच हा लाभ दिला जात आहे, पण लाभ मिळवून देतो म्हणून खासगी व्यक्ती, एजंटगिरी वाढल्याचे दिसत आहे. जास्तीचे पैसेही घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सहायक कामगार आयुक्त संदेश कचरे यांनी निवेदन प्रसिद्ध देऊन कामगारांना फसवणुकीपासून सावध राहण्यास सांगितले आहे. फसवणूक झाल्यास कामगार आयुक्त कार्यालय अजिबात जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून mahabocw.in या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाचे काम केले जात आहे. त्यासाठी नवीन नोंदणीसाठी ३७ रुपये (यात नोंदणीशुल्क २५ व वार्षिक वर्गणी १२) नूतनीकरणाकरता वार्षिक शुल्क १२ रुपये (दरमहा एक रुपया याप्रमाणे) शुल्क आकारणी होते. याव्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क आकारले जात नाही.
चौकट
नियोक्ता दाखला देतानाही खबरदारी घ्या
बांधकाम कामगार म्हणून नियोक्ता प्रमाणपत्र, दाखला देताना कंत्राटदार, नियोक्ता, प्राधिकृत अधिकारी यांनी ती व्यक्ती प्रत्यक्ष काम करत असल्याची तपासणी करूनच दाखला द्यावा, असे आदेशही सहायक आयुक्त आयरे यांनी काढले आहेत.