‘स्वीकृत’साठी रस्सीखेच जोरात
By Admin | Updated: January 14, 2016 00:25 IST2016-01-14T00:25:16+5:302016-01-14T00:25:16+5:30
महानगरपालिकेतील घडामोडी : चढाओढीने राष्ट्रवादीत वादंग, कार्यकर्त्यांची घालमेल वाढली

‘स्वीकृत’साठी रस्सीखेच जोरात
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी केवळ आपलीच वर्णी लागावी म्हणून कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप तसेच ताराराणी आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली असून ताराराणी आघाडी वगळता अन्य तीन पक्षात मात्र कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत तर याच मुद्यावरून वादावादीचे प्रकार घडला. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी शनिवारी (१६ जानेवारी) सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत अर्ज भरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा दिवस जसा जवळ येईल तशी इच्छुकांची घालमेल वाढली आहे. इच्छुकांनी नेत्यांची पाठ सोडलेली नाही. त्यांनी नेत्यांबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत. तर काही इच्छुक आपल्या भागातील शिष्टमंडळे नेऊन नेत्यांना भेटत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ, दिलेली जबाबदारी पार पाडली, पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार प्रामाणिकपणे केला असा हिशेबही आता इच्छुकांकडून मांडला जाऊ लागला आहे. मोजक्या जागा आणि इच्छुकांची संख्या अधिक यामुळे नेते मंडळींचीही डोकेदुखी बनली आहे.
सामाजिक संस्थेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यास स्वीकृत नगरसेवक होता येते याबाबत मनपा नगरसचिव कार्यालयाने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्याबाबतच्या खुलाशाचे पत्र बुधवारी प्राप्त झाले. संबंधित संस्थेच्या घटनेत ज्या पदांची नोंद असेल त्या पदावरील व्यक्तीला नगरसेवक होता येईल. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी उताऱ्याची आवश्यकता लागणार नाही असे कळविण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतीतला संभ्रमही आता दूर झाला आहे.
शनिवारी चारही पक्षाच्या गटनेत्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून आयुक्त कार्यालयात सादर करायचा आहे. त्यामुळे पाचच अर्ज स्वीकृतसाठी येणार हे स्पष्ट आहे. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर हे २० जानेवारीला होणाऱ्या सभेत निवडीचा प्रस्ताव मांडतील. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसकडून ‘सतेज’ वरदहस्त महत्त्वाचा
काँग्रेसच्या कोट्यातून दोघांना नगरसेवक होण्याची संधी मिळणार असून आमदार सतेज पाटील यांचा ज्यांना वरदहस्त लाभेल त्यांना ही संधी मिळेल. काँग्रेसमध्ये उत्तरमधून एक व दक्षिणमधून एकाला ही संधी देण्यात येईल. हरिदास सोनवणे, विजयसिंह देसाई, अजित पोवार-धामोडकर, मोहन सालपे आदींनी प्रयत्न चालविले आहेत. प्रा. जयंत पाटील यांचे नावही कॉँग्रेसच्या कोट्यातून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीत मान्यवर इच्छुक
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये माजी महापौर आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, राजेश लाटकर, आदिल फरास, अजित राऊत, उत्तम कोराणे, विनायक फाळके यांनी आपली निवड व्हावी म्हणून ‘फिल्डिंग’ लावली आहे. विशेष म्हणजे सर्वच इच्छुकांनी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे एकाची निवड करताना आमदार हसन मुश्रीफ यांची कसोटीच ठरणार आहे. पक्षाचे खंदे कार्यकर्ते जयकुमार शिंदे यांनी नुकतीच मुश्रीफ यांची भेट घेऊन ज्यांनी यापूर्वी सत्ता भोगली आहे त्यांना नगरसेवक न करता सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे फॅ क्सद्वारे निवेदन पाठवून आपला विचार करावा, अशी मागणी केली आहे.
‘ताराराणी’तून सुनील कदम निश्चित
ताराराणी आघाडीतून इच्छुकांची संख्या फारशी नाही. माजी महापौर सुनील कदम यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. सुनील कदम यांनी ताराराणी आघाडीची बाजू मनपा निवडणुकीत सांभाळली होती. उमेदवार ठरविण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत सुनील कदम व सुनील मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.त्यामुळे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपमध्येही रस्सीखेच
राज्यात व देशात भाजपची सत्ता असल्याने तसेच महापालिकेतही चांगल्या जागा जिंकल्या असल्याने भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भाजपमधून पूर्वीश्रमीचे भाजयुमो व भाजपचे कार्यकर्ते सुनील मोदी यांचे नाव ‘स्वीकृत’च्या यादीत चर्चेत पुढे आहे. मोदींच्या नावामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, राहुल चिकोडे, विजय जाधव, संदीप भिवटे, श्रीकांत गुंटे, तुषार देसाई यांनी पक्षाकडे स्वीकृतसाठी मागणी केली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.