पवार यांच्या दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त, वादावादीचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:09+5:302021-06-16T04:33:09+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष न घातल्याबद्दल काही मूठभर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक उधळून लावण्याचा तसेच काळे झेंडे दाखवून ...

पवार यांच्या दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त, वादावादीचे प्रकार
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष न घातल्याबद्दल काही मूठभर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक उधळून लावण्याचा तसेच काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा दिल्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने द्यायला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना बसला.
उपमुख्यमंत्री पवार यांची बैठक असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांची फळी भेदून पवार यांच्यापर्यंत जाणे मुश्कील झाले. इशारा मूठभर कार्यकर्त्यांनी दिला खरा पण त्यामुळे सामान्यांची मात्र गैरसोय झाली. पोलिसांनी विश्रागृहाला कडे केल्यामुळे तसेच बॅरिकेट, दोरखंड लावून नागरिकांना प्रवेश बंद केला.
केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच नाही, तर काही आमदार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनाही आत जाण्यासाठी बऱ्याच विनवण्या कराव्या लागल्या. आमदारांच्या गाडीत बसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीतून उतरविले आणि केवळ आमदारांनाच आत सोडले. विश्रामगृहाच्या समोरील रस्त्यावर गर्दी होत असताना या गर्दीला सुध्दा पोलिसांनी लांबपर्यंत हटकले. त्यामुळे भेटायला येणारे नागरिक व पोलीस अधिकारी यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला.
-कार्यकर्ते -अधिकारी यांच्यात वादावादी -
रिपब्लिकन पार्टीचे प्रा. शहाजी कांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर यांना पोलिसांनी रस्त्यावरील गेटवर रोखले. शिंदे, कल्याणकर यांनी आपण पक्षाचे पदाधिकारी असल्याने तुम्ही अडविण्याचा काय संबंध अशी विचारणा पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना केली. त्यावेळी गुजर यांनी त्यांना आत सोडण्यास ठाम नकार दिला. एवढेच नाही तर त्यांना गेटपासून दूर जाऊन थांबा असे सुनावले. त्यामुळे शिंदे - कल्याणकर संतप्त झाले. पवार साहेब आल्यावर त्यांची गाडी थांबवून आत सोडायला सांगू का असे म्हणताच गुजरही संतप्त झाले. वाद भलताच चिघळला. प्रा. शहाजी कांबळे यांनी त्यात भाग घेतला. अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व्ही.बी. पाटील यांनी या वादात मध्यस्थी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातही हाच गोंधळ सुरु होता. बैठक सुरु असताना सभागृहाच्या बाहेर मंडप घालण्यात आला होता. त्या ठिकाणीही कोणाला थांबू दिले जात नव्हते. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अनेकांना निवेदनेही देता आली नाहीत.
फोटो क्रमांक - १४०६२०२१-कोल-पोलिस बंदोबस्त
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी बैठक सुरु असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छाया : आदित्य वेल्हाळ.