तिकीट तपासनीसाकडून मारहाण
By Admin | Updated: June 3, 2015 01:06 IST2015-06-02T23:55:22+5:302015-06-03T01:06:59+5:30
पोलिसात तक्रार : महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना

तिकीट तपासनीसाकडून मारहाण
मिरज : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनीसाने प्रवीण रामचंद्र वसेकर (वय ३६, रा. दियेवाडी, ता. शिराळा) यांना विनातिकीट प्रवास करीत असल्याने धावत्या रेल्वेत मारहाण केली. याबाबत प्रवीण वसेकर या प्रवाशाने मंगळवारी मिरज रेल्वे पोलिसांत तक्रार दिली आहे.
पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करणारे प्रवीण वसेकर सोमवारी रात्री कोल्हापूर स्थानकात महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटताना रेल्वेत चढल्याने त्यांच्याकडे तिकीट नव्हते. वळीवडे स्थानकाजवळ कृष्णा माने या तिकीट तपासनीसाने त्यांना तिकिटाची विचारणा केली व ते विनातिकीट असल्याने साडेतीन हजार रुपये दंड भरण्यास फर्माविले. प्रवीण वसेकर यांनी दोन हजार रुपये दंड भरण्याची तयारी दर्शविली. मात्र तिकीट तपासनीस माने याने दंड कमी करण्यास नकार दिल्याने दोघांत बाचाबाची झाली. माने यांनी रेल्वेतील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून वसेकर यांना पोटात व तोंडावर ठोसे मारल्याची तक्रार आहे. मारहाणीमुळे वसेकर यांच्या कानाला दुखापत झाली असून त्यांनी तिकीट तपासनीस कृष्णा माने याच्याविरुध्द मिरज रेल्वे पोलिसांत मारहाणीची तक्रार दिली आहे.
रेल्वे तिकीट तपासनीस व प्रवाशांत हाणामारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. तिकीट तपासनीसांना नियमानुसार कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असतानाही, प्रवाशांना मारहाणीच्या तक्रारी येत असल्याने याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)