फुलेवाडी रिंग रोडवर तिघांना चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:51+5:302021-05-17T04:22:51+5:30
कोल्हापूर : शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारणाऱ्या तिघांना धारदार चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. फुलेवाडी रिंग रोडवर एच.पी. ...

फुलेवाडी रिंग रोडवर तिघांना चाकूने भोसकले
कोल्हापूर : शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारणाऱ्या तिघांना धारदार चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. फुलेवाडी रिंग रोडवर एच.पी. पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर शनिवारी रात्री हा प्रकार घडला. राहीब रफिक बागवान, आफताब बालीचंद नायकवडी, राज अख्तर मुजावर (सर्व रा. बिडी कामगार चाळ, साने गुरुजी वसाहत परिसर), अशी गंभीर जखमींची नावे आहेत. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : शाहरुख शिकलगार, सद्दाम कुंडले, आरबाज बागवान, शिवम डांगे, जुनेर बारस्कर, स्वप्नील कुरणे, तलाह अस्लम शेख, मार्शल (पूर्ण नाव नाही).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील फुलेवाडी रिंग रोडवर एच.पी. पेट्रोलपंप परिसरात काही युवक मद्य प्राशन करीत बसले असताना किरकोळ कारणांवरून वाद वाढून शिवीगाळ करण्यात आली. त्याबाबत साद बागवान, राज मुजावर, आफताब नायकवडे, अशरफ सय्यद या चौघांनी शाहरुख शिकलगार व सद्दाम कुंडले यांना जाब विचारला. त्यावरून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. वाद वाढत जाऊन संशयितांनी चौघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार चाकूने भोसकल्याने राहीब बागवान, आफताब नायकवडी, राज मुजावर हे गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर गोंधळ उडाल्याने पळापळ झाली. परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलीसही घटनास्थळी आल्याने संशयितांनी पलायन केले.
जखमींपैकी साद बागवान याच्या कमरेत दोन्ही बाजूला चाकूचे तीन वार, राज मुजावर याच्या पाठीत एक वार, तर नायकवडे याच्या पोटात दोन वार झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिघे सराईत गुन्हेगार
हल्लेखोरांपैकी शाहरुख शिकलगार, सद्दाम कुंडले, स्वप्नील कुरणे हे तिघेही पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
पाणी आण जा रे...
मद्य प्राशन करताना पाणी संपल्याने एकाने दुसऱ्याला ‘पाणी आण जा रे’ असे सांगितल्याने त्यातून हा वाद वाढून एकमेकांत शिवीगाळचा प्रकार घडला व त्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.