दरमहा तीन हजार पेन्शन द्यावी
By Admin | Updated: November 25, 2014 00:00 IST2014-11-24T23:42:04+5:302014-11-25T00:00:54+5:30
बांधकाम कामगार : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

दरमहा तीन हजार पेन्शन द्यावी
कोल्हापूर : बांधकाम कामगारांना त्यांच्या ६० वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्यावी, त्यांना घरबांधणीसाठी बिनव्याजी सुलभ हप्त्याने दोन ते पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी आज, सोमवारी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लाभार्थी कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज, प्रसुतीसंबंधीची मदत व मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचे अर्ज, घरबांधणी, दुरुस्तीसोबत जोडलेल्या यादीनुसार प्रलंबित अर्ज त्वरित मंजूर करण्यात यावेत, आदी मागण्या निवेदनात संघटनेने केल्या आहेत.
दुपारी टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात शंकर पुजारी, विजय बचाटे, विनायक फातेदार, प्रकाश भांडवलकर, जयश्री जासूद, आदींचा समावेश होता.