इचलकरंजीत तीन हजारांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: August 2, 2014 00:27 IST2014-08-02T00:26:54+5:302014-08-02T00:27:46+5:30
रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू

इचलकरंजीत तीन हजारांचा गुटखा जप्त
इचलकरंजी : येथील बालाजी बेकर्सजवळ एका दुकानवजा घरात छापा टाकून गावभाग पोलिसांनी सुमारे तीन हजार रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून, रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. एम. नलवडे यांना बालाजी बेकर्सजवळ असलेल्या राजू तनवाणी यांच्या दुकानवजा घरामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फौजदार प्रज्ञा देशमुख यांनी पोलीस पथकासह त्याठिकाणी छापा टाकला. यामध्ये स्टार, आरएमडी, रजनीगंधा व मिक्स पानमसाला अशा कंपन्यांच्या गुटख्यांचे सुमारे तीन हजार किमतीचे पुडे मिळून आले. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला असून, तनवाणी यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई श्रीधर कांबळे, मदन मदाळे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
कारवाईनंतर गुटख्याच्या किमतीत वाढ
गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकून पोलिसांनी कारवाई केल्यामुळे शहरात गुटखा विक्री करणारे पानपट्टीधारक व खाणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. याचा गैरफायदा घेत काहीजण चढ्या किमतीने गुटख्याची चोरून विक्री करीत आहेत. एरव्ही दहा रुपयांना मिळणारा गुटखा पंधरा रुपयांपर्यंत, तर चाळीस रुपयांचा गुटखा ७० रुपयास विकला जात आहे. विक्री करतानाही नेहमीचे ग्राहक व ओळखीच्या व्यक्तींनाच गुटखा विकला जात आहे.