संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापुरातील तब्बल तीन कलाकृतींना देशातील प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात केवळ नामांकनच नव्हे, तर मानाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ‘मेटाफर’, शाहुवाडी तालुक्यातील किरण पोटे यांचा ‘शाळा सुटली’ आणि कागल तालुक्यातील धीरज बोडके याच्या ‘रुबिक्स क्यूब’ या लघुपटांनी हे कौतुक मिळविलेले आहे.मेटाफर : शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफर’ या स्त्रीप्रधान लघुपटाचे मुंबईतील प्रतिष्ठेच्या यशवंत लघुपट महोत्सवात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्क्रीनिंग झाले. तिथे या लघुपटाचे ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल, नामवंत छायालेखक महेश लिमये, पटकथा लेखक मनीषा कोरडे, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी कौतुक केले. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रातील साहिल धेंडे आणि प्रवीण पांढरे या दोन विद्यार्थ्यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या लघुपटात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हाताळला आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनीही त्यांचे कौतुक केले.
रुबिक्स क्यूब : कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथील धीरज यशवंत बोडके याने अनाथ मुलांच्या अंधकारमय जीवनावर भाष्य करत त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणाऱ्या सामाजिक संदेश देणाऱ्या ‘रुबिक्स क्यूब’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष पुरस्कार आणि कोलकाता येथील रेड इन्कार्नेशन फिल्म फेस्टिवलमध्ये तब्बल सात पुरस्कार मिळाले आहेत. या लघुपटाची २८ देशांतील विविध महोत्सवासाठी निवड झाली आहे. छायाचित्रकार जयसिंग चव्हाण यांच्यासह साई पोद्दार आणि अर्पित जोशी या कोल्हापूरच्याच कलाकारांनी याचे छायांकन केले आहे. याचे संकलनही कोल्हापूरच्याच प्रशांत भिलवडे याने केले आहे.
शाळा सुटली : ड्रीम रिबन मुंबई निर्मित आणि मदन मिरजकर प्रस्तुत शाहुवाडी तालुक्यातील किरण पोटे यांनी दिर्ग्शित केलेल्या ‘शाळा सुटली’ या लघुपटाला देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट चाइल्ड शॉर्ट फिल्म म्हणून एक आणि बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट म्हणून मिथ्याच्या भूमिकेसाठी शौर्य अनिल पाटील याला एक असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.