कोल्हापुरातून तीनच यात्रेकरू
By Admin | Updated: July 8, 2015 00:02 IST2015-07-08T00:02:27+5:302015-07-08T00:02:27+5:30
कैलास-मानस सरोवर यात्रा : पावणेदोन लाख रुपये खर्च

कोल्हापुरातून तीनच यात्रेकरू
कोल्हापूर : कैलास मानस सरोवर या १९ हजार ५०० फुुटांवरील चीनव्याप्त तिबेटमधील यात्रेस जाणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. गेल्या वर्षी सहा यात्रेकरू कोल्हापुरातून गेले होते; तर यंदा केवळी तीनच यात्रेकरूंनी या यात्रेसाठी केंद्र शासनाकडे नोंद केली आहे. या उलट अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यंदा कोल्हापुरातून या यात्रेसाठी सातशेंहून अधिक लोक जात आहेत. कैलास मानस सरोवर यात्रेचे नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत केले जाते. याची जाहिरात दरवर्षी फेबु्रवारीमध्ये प्रसिद्ध होते. या यात्रेकरिता सुमारे दोन लाख रुपये इतका खर्च येतो. चीनव्याप्त तिबेटमध्ये याचे स्थान असल्याने यात्रेकरूंकडील पासपोर्ट यासाठी महत्त्वाचा आहे. यंदापासून ही यात्रा उत्तराखंडातील लिपुलेख पासवरून व सिक्कीममधील नथुला पास येथून आयोजित केली जाणार आहे. ८ जून ते ९ सप्टेंबरअखेर ही यात्रा २३ बॅचेसमधून भारतातून सोडली जाणार आहे. यात
६०जणांची एक तुकडी अशा १८ तुकड्या उत्तराखंडातील लिपुमार्गे, तर पाच तुकड्या सिक्कीम नथुलामार्गे सोडण्यात येणार आहेत. यात्रेकरिता सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय दिल्ली येथे चार दिवस वैद्यकीय तपासणी व व्हिसा याकरिता लागणार आहेत. आपण कोणत्या मार्गाने जाणार हे यात्रेकरूंनी अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. तीस दिवसांचा यात्रेचा कालावधी व पासपोर्ट, तपासण्या या किचकट बाबींमुळे यात्रेकरूंमध्ये घट होऊ लागली आहे.
या उलट भारतातील अमरनाथ या श्री शंकर भोलेनाथांच्या पवित्र गुंफेचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये वाढ होऊ लागली आहे.
यंदा कोल्हापुरातून ७०० हून अधिक यात्रेकरू जात आहेत. त्यांतील पहिला जथ्था गुरुवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवानाही झाला.
राज्य शासनाच्या मदतीची गरज
गुजरात सरकार कैलास-मानस सरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांना मदत करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनानेही मदत करावी. या यात्रेत केवळ धार्मिक यात्रा म्हणून न पाहता ट्रेकिंग एक्सपिडिशन अर्थात गिर्यारोहण मोहीम म्हणून पाहणे गरजेचे आहे; कारण यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात चालतच जावे लागते. याशिवाय यात्रेकरूंनाही ३० दिवस प्रवास आणि चालण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यात्रेकरूंमध्ये घट होऊ लागली आहे.
- सूर्यकांत गायकवाड,
मार्गदर्शक, कैलास-मानस सरोवर यात्रा, कोल्हापूर.