दोघा परिरक्षण भूमापकासह तिघांना अटक
By Admin | Updated: September 27, 2014 00:51 IST2014-09-27T00:43:30+5:302014-09-27T00:51:26+5:30
कोपार्डे, कोडोली येथील घटना : भूमापन कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

दोघा परिरक्षण भूमापकासह तिघांना अटक
कोल्हापूर : वडिलार्जित घरांवरील बहिणींचे हक्कसोडपत्र नोंद करून घेण्यासाठी अडीच हजारांची लाच घेताना कोपार्डे (ता. करवीर) येथील नगर भूमापन कार्यालयाचे परिरक्षण भूमापक संशयित सोनबा धोंडिराम निगडे (वय ४६) व खासगी इसम सर्जेराव बंडू पाटील (दोघे रा. कोपार्डे) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली तर वडिलार्जित मालमत्तेवर वारसा नोंद करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना कोडोली (ता. पन्हाळा) येथील संशयित नगरभूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक बाळू बाबू कांबळे याला आज शुक्रवारी अटक केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी , वाकरे (ता. करवीर) येथील बाजीराव बळिराम पाटील यांच्या गावी वडिलार्जित घर गट नंबर १०६८, १०५८ व ७०३ मध्ये आहे. या गट नंबरवर बाजीराव पाटील यांच्यासह तीन बहिणींची नावे आहेत. बाजीराव यांचे वडील मृत झाल्याने त्यांनी घरांवर वारसांची नोंद करून घेतली. त्याप्रमाणे त्यांनी कोपार्डे येथील नगर भूमापन कार्यालयात २३ सप्टेंबर २०१४ रोजी वडिलार्जित घरांवरील बहिणींचे हक्कसोडपत्र नोंद करून घेण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर ते संशयित सोनबा निगडे यांना भेटले. निगडेने ‘तुम्ही सर्जेराव पाटील यांना भेटा. ते तुमचे काम करून देतील’असे सांगितले. त्यानंतर बाजीराव पाटील हे सर्जेराव पाटील याला भेटले. त्यावेळी ‘तुम्ही तीन हजार रुपये द्या, तरच काम करू’ असे म्हणून हे पैसे साहेबांना द्यावे लागतात, असे त्यांनी त्यांना सांगितले. यानंतर काल, गुरुवारी बाजीराव पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज, शुक्रवारी कोपार्डेतील नगर भूमापन कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित सोनबा निगडे व सर्जेराव पाटील यांना तक्रारदार बाजीराव पाटील यांच्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, पोलीस नाईक जितेंद्र शिंदे, मनोज खोत, संजय गुरव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पावलेकर, साहाय्यक फौजदार सर्जेराव पाटील यांनी केली. तसेच वडिलार्जित मालमत्तेवर वारसा नोंद करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना कोडोली (ता. पन्हाळा) येथील नगरभूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापकाला आज, शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बाळू बाबू कांबळे (रा.एमएसईबी कार्यालयाजवळ कोडोली, मूळ गाव - दिघवडे, ता. पन्हाळा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची तक्रार भिकाजी शंकर वग्रे (रा. मसूदमाले, ता. पन्हाळा)यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मसूदमाले येथील भिकाजी वग्रे यांनी वारस म्हणून नोंद करण्यासाठी कोडोलीतील नगर भूमापन कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार नोंद करण्यासाठी बाळू कांबळे यांनी एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, या तक्रारीनुसार नगर भूमापन कार्यालयात पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना संशयित बाळू कांबळे याला रंगेहात पकडले. रात्री उशिरा संशयित कांबळे याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीधर सावंत, अमर भोसले, दयानंद कडूकर, उल्हास हिरवे आदींनी केली.