खूनप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेप

By Admin | Updated: August 27, 2014 00:18 IST2014-08-27T00:02:53+5:302014-08-27T00:18:36+5:30

जमिनीच्या वादातून घुणकीत झाला होता खून

Three murderers have been given life imprisonment | खूनप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेप

खूनप्रकरणी तिघा आरोपींना जन्मठेप

कोल्हापूर : घुणकी (ता. हातकणंगले) येथील शेतजमिनीच्या वादातून झालेल्या संदीप श्रीपती डोईफोडे (वय २३) खूनप्रकरणी दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी आज, मंगळवारी तिघा आरोपींना जन्मठेप व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. संशयित आरोपी श्रीकांत यल्लाप्पा डोईफोडे (वय ४२), त्याचा भाऊ प्रवीण (३८) व शंकर आकाराम डोईफोडे (२६, सर्व रा. घुणकी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत, तर तीन महिलांसह अल्पवयीन मुलींची निर्दोष मुक्तता केली.
अधिक माहिती अशी, संदीप डोईफोडे याच्या आई-वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. त्याचा मोठा भाऊ जनार्दन हा मुंबईला नोकरीस आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ बहिणीने केला. त्यानंतर तो परत गावी आला. येथील वडिलोपार्जित जमीन संशयित आरोपी कसत होते. ती जमीन त्यांच्याकडून काढून तो स्वत: कसूृ लागला. जमीन काढून घेतल्याचा राग आरोपींना होता. जमीन कसण्यास ते मागत होते; परंतु तो देत नसल्याने त्यांनी अनेकवेळा त्याला मारहाण केली होती. दि. ५ जुलै २०११ रोजी सकाळी पुन्हा संदीपशी त्यांनी संध्याकाळपर्यंत तुला संपवितो म्हणून धमकी दिली. या भीतीने त्याने मित्र अनिल रामराव डोईफोडे, अविनाश बराले, राजू शिंदे यांना मोबाईलवरून वरील प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर हे सर्व व संदीपचा मेहुणा अजय शिंदे, संतोष डोईफोडे हे एकत्र भेटले. या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर बसून हा वाद मिटविण्याचा निर्णय घेतला. त्याचे व आरोपींचे घर समोरासमोर असल्याने सर्वजण घरी सोडण्यासाठी गेले.
चांभार गल्लीपर्यंत सर्व आल्यानंतर विद्युत खांबाजवळ बोलत बसले. यावेळी संदीप घराकडे जात असताना संशयित आरोपी जया, वर्षा, जयश्री, माधुरी बोळातून पळत आले. वर्षा व जयश्रीने हातातील चटणी संदीपच्या डोळ्यात फेकली व प्रवीण, शंकर आणि श्रीकांतने कोयत्याने त्याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संदीपला कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयामध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल रामराव डोईफोडे याने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारतर्फे तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल डोईफोडे, संतोष डोईफोडे व अविनाश हराळे यांची साक्ष घेण्यात आली. डॉक्टर, पोलीस, पंच असे एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. यातील डॉ. संदीप शिरगावकर व डॉ. प्रीती भोसेकर यांची साक्ष, तर पोलीस हवालदार आर. आर. यादव यांची सरकारतर्फे महत्त्वाची मदत ठरली.
या सर्व गोष्टी ग्राह्य मानून मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जमादार यांनी संशयित आरोपी श्रीकांत यल्लाप्पा डोईफोडे, त्याचा भाऊ प्रवीण व शंकर आकाराम डोईफोडे यांना जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड सुनावली, तर महिला संशयित आरोपी जयश्री श्रीकांत डोईफोडे, वर्षा प्रवीण डोईफोडे, माधुरी आकाराम डोईफोडे यांच्यासह अल्पवयीन मुलींची निर्दोष सुटका करण्यात आली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील मानसिंग सुर्वे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Three murderers have been given life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.