जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांना आमदारकीची लॉटरी

By Admin | Updated: October 22, 2014 00:26 IST2014-10-22T00:01:05+5:302014-10-22T00:26:00+5:30

मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे.

Three members of the Zilla Parishad are the MLAs lottery | जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांना आमदारकीची लॉटरी

जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांना आमदारकीची लॉटरी

कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केलेले तीन सदस्य आता आमदार झाले आहेत. विद्यमान सदस्य अमल महाडिक भारतीय जनता पक्षाकडून, तर माजी सदस्य प्रकाश आबिटकर व सत्यजित पाटील-सरूडकर शिवसेनेतून आमदार झाले आहेत. ‘जिल्हा परिषद ते विधानसभा’ असा त्यांचा राजकीय आलेख उंचावला आहे.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्था राजकारणातील कार्यशाळा म्हणून मानली जाते. राजकीय करिअर करू इच्छिणारे येथूनच निवडणुकीच्या फडात उडी टाकतात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघांतील वाड्या-वस्त्यांवर संपर्क वाढतो. राज्य आणि केंद्राच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे मतदारसंघातील जनतेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संपर्क येतो. क्रियाशील, प्रभावी काम करण्याची शैली असलेले सदस्य जिल्हा परिषद मतदारसंघासह तालुका, विधानसभा मतदारसंघ यामध्ये स्वत:ची ओळख अणि गट निर्माण करतात. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. प्रसंगी ज्यांचे बोट धरून राजकारणात चंचुप्रवेश करतात अशा आपल्या गुरूंच्या विरोधात नंतर शड्डू ठोकतात. गुरूंना हरवून आमदार होतात, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आजवरचा इतिहास आहे.
जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव जाधव, उदयसिंहराव गायकवाड यांनी आमदार व खासदारकीपर्यंत मजल मारली. बाळासाहेब माने जिल्हा परिषद अध्यक्ष होत. पुढे तेही खासदार झाले होते. सदाशिव मंडलिक, नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, बाबा कुपेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यातील भरमू पाटील यांनी मंत्री म्हणून, तर कुपेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले. हसन मुश्रीफ यांनी पंचायत समिती सभापती म्हणून काम केले आहे. सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. ते आता चौथ्यांदा आमदार झाले आहेत. खासदार राजू शेट्टी हेही जिल्हा परिषदेचे सदस्य होते. सदस्यपदाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच शेट्टी आमदार झाले. आमदारकीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच खासदार झाले. या विधानसभा निवडणुकीत विद्यमान सदस्य अमल महाडिक, माजी सदस्य आबिटकर, पाटील-सरूडकर आमदार झाले आहेत. (प्रतिनिधी)

मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे.
एका सदस्याचा पराभव...
गडहिंग्लज तालुक्यातील अप्पी पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहातून विधानसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली.

Web Title: Three members of the Zilla Parishad are the MLAs lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.