शहरातील तीन प्रमुख रस्ते बंद, वाहतूक अन्य मार्गाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:45+5:302021-03-17T04:25:45+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी शहरातील तीन प्रमुख रस्ते पुढील ४५ दिवस ...

शहरातील तीन प्रमुख रस्ते बंद, वाहतूक अन्य मार्गाने
कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी शहरातील तीन प्रमुख रस्ते पुढील ४५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शहरातील नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. हे काम आज, बुधवारपासून (दि. १६) सुरू करण्यात येत आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम पुढील ४५ दिवस सुरू रहाणार आहे. रस्त्यावर टाकाव्या लागणाऱ्या जलवाहिनीचा व्यास मोठा असल्याने कामासाठी रस्ता पूर्णत: बंद करणे आवश्यक आहे.
या कामाच्या ठिकाणच्या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक बंद राहणार आहे. शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. तीनही रस्ते शहरातील प्रमुख रस्ते असून, आयआरबी कंपनीने केलेले आहेत. अत्यंत सुस्थितीतील रस्ते जेसीबीच्या सहाय्याने उकरण्यात येत आहेत. जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होताच रस्ते दुरुस्तीचे कामही तातडीने हाती घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. अमृत योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी शहरात तसेच उपनगरांत अशा पद्धतीने जलवाहिनी टाकल्या; परंतु त्याठिकाणी रस्ते केले नाहीत, अशा तक्रारी खुद्द नगरसेवकांनी केल्या होत्या. म्हणूनच प्रमुख रस्ते खुदाई झाल्यानंतर ते तत्काळ दुरुस्त करावेत, या कामाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
हे रस्ते होतील बंद
१. जिल्हाधिकारी कार्यालय ते शासकीय विश्रामगृह
२. सायबर चौक ते लकी बझार
३. कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्र ते गोळीबार मैदान