तीन लाख पर्यटक भुलले पाचगणीतील निसर्गाला
By Admin | Updated: August 18, 2014 23:30 IST2014-08-18T22:54:08+5:302014-08-18T23:30:55+5:30
निसर्गाचे दर्शन डोळ्यांमध्ये साठविण्याबरोबरच अनेकांनी कॅमेरे, मोबाईलमध्ये बंदिस्त

तीन लाख पर्यटक भुलले पाचगणीतील निसर्गाला
पाचगणी : हिरवागार शालू पांघरलेल्या सह्याद्रीच्या कड्याकपारीचं आकर्षण देश-विदेशातील पर्यटकांना कायमच असते. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन, रविवारची सुटी व सोमवारी गोपाळकालाची सुटी या सलग सुट्यांमुळे देशभरातील तीन लाख पर्यटकांनी पाचगणी, महाबळेश्वरला भेट दिली.महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर येथील डोंगराळ भागातून खळाळणारे धबधबे पाहणे निसर्गप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. पाचगणी परिसरात श्रावणसरीचा अनुभव येत असून, ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे पावसात मनसोक्त भिजणं अन् तासाभरात पुन्हा वाळणं हे पर्यटकांच्या मनाला आनंद मिळवून देत आहे.
येथील निसर्गरम्य परिसर पुन्हा बहरू लागला आहे. परिसरातून वाहत असलेले लहान-मोठ्या धबधब्यांच्या पाण्यात मनसोक्त खेळणे, टेबललँडवर ढगांच्या पुंजक्यातून फेरफटका मारणे हे करत असताना स्वर्गच धरतीवर उतरल्याचा आभास होत आहे. या निसर्गाचे दर्शन डोळ्यांमध्ये साठविण्याबरोबरच अनेकांनी कॅमेरे, मोबाईलमध्ये बंदिस्त केले. (वार्ताहर)