कागलमध्ये तीनशे पोलीस, दिवसभर तणावपूर्ण शातंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:23+5:302021-09-21T04:26:23+5:30
जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला असला तरी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गटागटाने उभे राहून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे ...

कागलमध्ये तीनशे पोलीस, दिवसभर तणावपूर्ण शातंता
जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला असला तरी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गटागटाने उभे राहून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे चित्र होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र जमण्याचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केले तरी खबरदारी म्हणून ठिक-ठिकाणी अडथळे उभे करून शहरात येणाऱ्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दोन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीनशे पोलीस असा फौजफाटा कागल पोलीस ठाण्यात यासाठी तैनात होता. येथील बसस्थानक परिसरात सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भय्या माने, तालुका अध्यक्ष विकास पाटील, प्रवीण काळबर, दत्ता पाटील, आदी पदाधिकारी जमाव जमा होऊ नये यासाठी उभे होते.
रात्रीच लागू केल्या प्रतिबंधात्मक नोटिसा
कागल पोलिसांनी शहरातील सुमारे सत्तर कार्यकर्त्यांना रात्रभर फिरून पाचपेक्षा अधिक जण एकत्र येऊ नका. या आशयाच्या नोटिसा बजावल्या. रात्री झोपेतून उठवून अनेकांना या नोटिसा लागू केल्या जात होत्या. यामध्ये विद्यमान नगरसेवक आणि आजी-माजी पदाधिकारी यांचा समावेश होता.
सोमय्या मानसिकदृष्ट्या ढासळलेले.
भय्या माने म्हणाले, किरीट सोमय्याचा कोण आहेत ? ते स्वतःला न्यायाधीश समजतात का? आरोप केलेत तर रितसर चौकशी होईल पण नाटकबाजी कशाला करताय. कोल्हापुरात येऊन शाहूनगरीला डिवचण्याची भाषा त्यांनी करू नये. त्यांनी अशीच धमकीची भाषा ठेवली तर त्यांना आम्ही कोल्हापुरी पद्धतीने जाब विचारणारच. खरेतर त्यांची कालपासूनची एकूण वर्तवणूक पाहिली तर ते मानसिकदृष्ट्या ढासळलेले दिसत होते.