शेवटच्या दहा मिनिटांत केले तीन गोल

By Admin | Updated: December 12, 2014 00:36 IST2014-12-12T00:24:10+5:302014-12-12T00:36:06+5:30

कोल्हापूरचा फुटबॉल...

Three goals scored in the last 10 minutes | शेवटच्या दहा मिनिटांत केले तीन गोल

शेवटच्या दहा मिनिटांत केले तीन गोल

साधारण १९६४-६५ चा काळ होता. त्याकाळी बागल चौक, शिवाजी तरुण मंडळ, बाराईमाम, प्रॅक्टिस क्लब आणि पाटाकडील तालमीचा संघ नुकताच निर्माण झाला होता. मी मॅट्रिक झालो अन् गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे आमच्या घरातच फुटबॉल वडिलांपासूनच रुजला होता. वडील गोपाळराव हे ‘बाराईमाम’कडून फुटबॉल खेळत. त्यांच्यामुळे मोठे भाऊ लक्ष्मणही ‘बालगोपाल’कडून फुटबॉल खेळू लागले. त्यांच्यामुळे मीही फुटबॉलकडे वळलो. याचदरम्यान पेठा-पेठांमध्ये सामने होत असत. असाच एक सामना बागल चौक विरुद्ध बालगोपाल तालीम यांच्यात सुरू होता. यात बागल चौक संघाने आमच्या ‘बालगोपाल’वर २-० अशी आघाडी मिळविली होती. ‘बालगोपाल’च्या पाठिराख्यांनी, तर आशाच सोडत रावणेश्वर तळे (आताच्या शाहू स्टेडियम) येथून काढता पाय घेतला. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना मी दोन गोल फेडून तिसरा गोल नोंदवत ३-२ असा सामना जिंकला. परंतु, बालगोपाल तालमीच्या परिसरातील पाठिराख्यांना आम्ही सामना जिंकल्याचे पटेना... एसटीचे ज्येष्ठ फुटबॉलपटू रघू पिसे हे फुटबॉल विश्वातील आपल्या कारकिर्दीविषयी सांगत होते.
ते म्हणाले, याच काळात मी गोखले कॉलेजकडून फुटबॉल खेळत असताना माझी शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. पहिला सामना पुणे विद्यापीठविरुद्ध होता. हा सामना आम्ही जिंकून पदार्पणातच मोठे यश मिळविले होते.
पावसाळ्यात बालगोपाल विरुद्ध एस. टी. महामंडळ यांच्यात शाहूपुरी मैदानावर सामना होता. पावसामुळे फुटबॉल भिजला होता. त्यात एस.टी.च्या यशवंत साळोखेने हेडद्वारे दोन गोल केले. त्यामुळे त्याचे डोके बधिर झाले. त्याला दोन दिवस काहीच कळत नव्हते. त्यामुळे त्याला रुग्णालयात अ‍ॅडमिट करावे लागले. मी बालगोपाल संघ, विद्यापीठ, आंतरविद्यापीठ, राज्यस्तर, आदी स्पर्धा गाजविल्याने माझे गुरू गोपाळराव घोरपडे यांनी मला एस. टी. महामंडळात नोकरी दिली. सध्या झटपट प्रसिद्धी मिळण्यासाठी जादा सराव न करता मुले थेट सामन्यात खेळायला येतात. त्यामुळे काही वर्षे केवळ खेळल्यानंतर ही मुले फुटबॉलच्या जगतातून बाहेर पडतात. मात्र, चमक काही दाखवित नाहीत. याकरिता कोल्हापूरच्या सर्व फुटबॉलपटूंनी खेळाची तंत्रे विकसित केली, तर नक्कीच आपली कोल्हापूरची मुलेही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवतील.
- शब्दांकन : सचिन भोसले

Web Title: Three goals scored in the last 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.