तीन माजी आमदार सेनेच्या दारात
By Admin | Updated: July 20, 2014 00:09 IST2014-07-20T00:08:33+5:302014-07-20T00:09:17+5:30
भाऊगर्दी : नरसिंग गुरुनाथ, संजय घाटगे, शहापूरकर, आबिटकर आदींनी घेतली भेट

तीन माजी आमदार सेनेच्या दारात
कोल्हापूर : माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील, संजय घाटगे, सत्यजित पाटील सरुडकर यांच्यासह प्रकाश आबिटकर डॉ. प्रकाश शहापूरकर, भूषण पाटील, आदी नेत्यांनी आज शनिवारी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिवाकर रावते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची शासकीय विश्रामधामवर जावून भेट घेतली. व शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली. त्यांना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार ‘आधी प्रवेश करा, नंतर उमेदवारीचे पाहू’ असे पक्षातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे या नेत्यांचा शिवसेना प्रवेश लवकरच होण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची चाचपणी व जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून मते आजमावून घेण्यासाठी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आ. दिवाकर रावते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आज येथे आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी दिवसभर इच्छुकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आदी उपस्थित होते.
यावेळी रावते व दुधवडकर यांनी मतदारसंघनिहाय पक्षाबाहेरील महत्वाच्या नेत्यांची मते जाणून घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रथम शिवसेनेत प्रवेश करा. त्यानंतरच उमेदवारीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील, असे या नेत्यांना सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी
उपाध्यक्ष व जनसुराज्य पक्षाचे नेते भारत पाटील यांनाही चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. परंतू ते कांही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले.
पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही उमेदवारीसंदर्भात संपर्कप्रमुखांसमोर इच्छा व्यक्त केली. हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आकाराम दबडे, शिवाजीराव कांबळे (रुकडी) यांनी, शिरोळमधून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी कागल, चंदगड, राधानगरी किंवा कोल्हापूर दक्षिण यापैकी कुठल्याही मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्तकेली. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही कोल्हापूर उत्तरमधून इच्छा व्यक्त केली. तसेच जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी ‘करवीर’मधून, ‘शाहूवाडी’तून उपजिल्हाप्रमुख जयवंत काटकर यांनी मागणी केली. कोल्हापूर उत्तरमधून माजी महापौर सई खराडे, नगरसेवक संभाजी जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे, शिवसेना ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष कमलाकर जगदाळे यांचीही नावे पक्षाला कळविण्यात आली आहेत. करवीर तालुकाप्रमुक राजू यादव कोल्हापूर दक्षिणमधून लढण्यास इच्छुक आहेत. संपर्कप्रमुखांनी जिल्हाप्रमुखांकडून मतदारसंघनिहाय पक्षाची ताकद, पक्षासाठी पोषक वातावरण व पक्षासह बाहेरून पक्षात येण्यास इच्छुक असलेल्या नेत्याविषयी चर्चा केली. इच्छुकांची मते, विधानसभानिहाय पक्षाची ताकद, असा अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर केला जाणार आहे, असे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)