चेन स्नॅचिंगच्या तीन घटनांत सात तोळे लंपास
By Admin | Updated: May 5, 2015 01:11 IST2015-05-05T01:11:46+5:302015-05-05T01:11:46+5:30
शहरात खळबळ : शाहूूपुरीत दोन, तर साळोखेनगरात एक घटना

चेन स्नॅचिंगच्या तीन घटनांत सात तोळे लंपास
कोल्हापूर : शहरात सोमवारी सलग तीन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने खळबळ उडाली. शाहूपुरीत दोन, तर साळोखेनगरात झालेल्या एका प्रकारात तब्बल सात तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
साळोखेनगर येथे सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. शीतल विश्वास पानारी (रा. हणमंतवाडी) असे दागिने गेलेल्या महिलेचे नाव आहे. लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात संशयितांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
शीतल पानारी या एका घरगुती लग्न समारंभासाठी हणमंतवाडी येथून साळोखेनगर येथील नातेवाइकांच्या घरी आल्या होत्या. सायंकाळी बांगड्या घालण्यासाठी त्या नातेवाईक अनिल बाबूराव साळोखे यांच्यासमवेत पदपथावरून चालत जात होत्या. दरम्यान, लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, मणीमंगळसूत्र व नेकलेस असे सोन्याचे दागिने हिसडा मारून नेले.
अचानक घडलेल्या प्रकाराने शीतल भांबावून गेल्या. अंधाराचा फायदा घेऊन दोघे चोरटे पसार झाले. सोन्याचे गंठण अडीच तोळे, मणीमंगळसूत्र एक तोळा व सोन्याचा नेकलेस दीड तोळा असे पाच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याची तक्रार शीतल पानारी यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. शतपावली करण्यास गेलेल्या वृद्धाची दीड तोळ्याची चेन व मोपेडवरून घरी जाणाऱ्या महिलेची पर्स चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केली.
नितीन अनंत रेडिज (वय ७०, रा. रुईकर कॉलनी) हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर फिरत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन हिसडा मारून पोबारा केला तसेच दीपिका दिनकर जावळे (५०, रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) ह्या मुलीसोबत मोपेडवरून रात्री नऊच्या सुमारास घरी जात होत्या. महासैनिक दरबार हॉलच्यासमोर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून घेत पलायन केले.