जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, तर १९ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST2021-02-21T04:47:31+5:302021-02-21T04:47:31+5:30

कोल्हापूर : राज्याच्या इतर जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोल्हापूरकरांसाठीही शनिवारी धोक्याची घंटा वाजली. केवळ चोवीस तासांत एका महिलेसह ...

Three died due to corona in the district, while 19 new patients | जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, तर १९ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, तर १९ नवीन रुग्ण

कोल्हापूर : राज्याच्या इतर जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोल्हापूरकरांसाठीही शनिवारी धोक्याची घंटा वाजली. केवळ चोवीस तासांत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला, तर १९ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे. कोल्हापूरकरांनी शहाणपणा दाखवून खबरदारी घेतली नाही तर संकट गडद व्हायला वेळ लागणार नाही.

गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील अन्य जिल्ह्यांत कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत चालल्यामुळे आरोग्य, तसेच प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. सर्व पातळीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. खबरदारी न घेणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधीचे निर्बंध अधिक कडक करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सात, आठ, दहा असे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत होते; परंतु शनिवारी हा आकडा १९ च्या घरात गेला. मागच्या काही दिवसांतील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची ही मोठी संख्या असल्याने, तसेच चोवीस तासांत तीन बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे डोळे विस्फारले आहेत. शनिवारी कोल्हापूर शहरातील साळोखेनगर येथील ८७ वर्षीय पुरुषाचा, तर नागाळापार्क येथील ८३ वर्षीय महिलेचा येथील खासगी रुग्णालयात, तर इचलकरंजी येथील ५७ वर्षीय पुरुषाचा येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.

शनिवारी जे १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले त्यापैकी १३ रुग्णांची कोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये झाली, तर सहा रुग्णांची तपासणी शासकीय लॅबमध्ये झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ५० हजार १७४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या असून, त्यापैकी ४८ हजार २८६ पूर्ण बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. १७३६ जणांचा मृत्यू झाला. सध्या १५२ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

-संकट ओढावून घेऊ नका-

कोरोनाचा कहर कोल्हापूरकरांनी अनुभवला आहे. त्याची भयानकता, उपचारात येणाऱ्या अडचणी, तोकडी पडणारी यंत्रणा, अनेक कुटुंबांची झालेली फरपट या सगळ्या वास्तव वातावरणातून जाण्याचे दुर्भाग्य कोल्हापूरकरांच्या नशिबी आले होते. त्यामुळे पुन्हा हे संकट ओढावून घेणे महागात पडेल. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे, येणारे संकट प्रशासनावर नाही तर आपल्या स्वत:वरच आहे याची जाणीव नागरिकांनी ठेवावी.

Web Title: Three died due to corona in the district, while 19 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.