तीन दशकांचे अथक परिश्रम अन फुललेले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:37+5:302021-07-01T04:17:37+5:30

वर्ष १९८९-९०....अत्यंत दूरदृष्टीचा तरुण तळसंदेसारख्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे, हा कॅम्पस 'एज्युकेशन हब' बनवण्याचे स्वप्न पाहतो. जिद्द, ध्येय ...

Three decades of hard work and a flourishing paradise | तीन दशकांचे अथक परिश्रम अन फुललेले नंदनवन

तीन दशकांचे अथक परिश्रम अन फुललेले नंदनवन

वर्ष १९८९-९०....अत्यंत दूरदृष्टीचा तरुण तळसंदेसारख्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे, हा कॅम्पस 'एज्युकेशन हब' बनवण्याचे स्वप्न पाहतो. जिद्द, ध्येय व चिकाटीला प्रचंड मेहनतीची जोड देत नव्या प्रवासाला सुरुवात करतो. तीन दशकांच्या अथक परिश्रमातून कृषीविषयक विविध प्रयोग, शिक्षण संस्था असा विस्तार करत या ठिकाणी कृषी व तंत्र क्षेत्रातील विद्यापीठाची स्थापना करतो... डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील हे या जिद्दी तरुणाचे नाव... तळसंदे येथील डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे आज गुरुवारी उद्घाटन होत असून डॉ. संजय डी. पाटील यांनी पाहिलेल्या त्यांच्या स्वप्नाचा प्रवास आज खऱ्या अर्थाने वास्तवात उतरत आहे. त्यानिमित्ताने...

-

संपूर्ण देशभरात उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालायाची ३७ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये डॉ. डी. वाय पाटील (दादासाहेब) यांनी कसबा बावडा येथे स्थापना केली. आपले पुत्र संजय पाटील यांच्याकडे त्यांनी या महविद्यालयाचे नेतृत्व सोपवले. त्यांनी आपली उत्तम नेतृत्व कौशल्य व दूरदृष्टीने विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या ग्रुपचा विस्तार केला. संजय पाटील यांना सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्राची आवड होती. दादासाहेबांनी ही आवड ओळखून त्यांना शेती खरेदी करण्यास प्रेरणा दिली. त्यानुसार डॉ. संजय पाटील यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तळसंदे येथे १९८९-९० ला १४८ मालकांना एकत्र आणत २०५ एकर शेतीची खरेदी केली.

त्यावेळी हे क्षेत्र म्हणे एक माळरान होते. डोंगराळ, मुरबाड असलेल्या या जमिनीवर डॉ. संजय पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. हजारो ट्रॉली भरून अन्य ठिकाणची सुपीक माती या ठिकाणी टाकण्यात आली व बैलगाडीमधून टँकरचे पाणी आणून या ठिकाणी झाडे लावण्यात आली. कालांतराने वारणा नदीवर जॅकवेल बांधून पाणी योजना करण्यात आली आणि हळूहळू हा परिसर हिरवाईने नटू लागला. डॉ. संजय पाटील यांच्याकडून शेतीतील विविध प्रयोग या ठिकाणी करण्यात आले. या परिसरात आज ६ कोटी लिटर पाणी साठवण व्यवस्था असून शेततळी व पाणी योजनेतून परिसर हिरवागार बनवण्यात आला आहे. या कॅम्पसमध्ये तब्बल साडेचार हजार नारळ झाडे असून ३० प्रकारचा भाजीपाला व ड्रॅगनसह २० प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जाते. हा सर्व परिसर 'ऑक्सिजन झोन' म्हणून आज ओळखला जात आहे.

कृषी क्षेत्रातील विविध प्रयोगांची दखल घेत डॉ. संजय पाटील यांना वसंतराव नाईक कृषी भूषण, इंदिरा प्रियदर्शिनी, बळीराजा, सकाळ अग्रोवान एक्सलन्स अवाॅर्ड, विद्याभारती, 'वनश्री पुरस्कार', गोल्डस्टार इंटरनशनल अवाॅर्ड यासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. बेंगळुरू येथील अखिल भारतीय आंबा महोत्सवात प्रथम क्रमांकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना हिमाचल प्रदेश विद्यापीठाने 'डॉक्टरेट' देऊन गौरवले आहे.

कृषीविषयक अद्ययावत ज्ञान, नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे यासाठी १९९१ मध्ये या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या विस्तीर्ण परिसरात सध्या ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर व एमबीए महविद्यालय सुरू असून साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आहे. अत्याधुनिक गोशाळा व डेअरी फार्म या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे.

निसर्गसौदर्याने नटलेल्या, आधुनिक शेतीच्या प्रयोगांनी बहरलेल्या या भूमीत कृषी क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण अनुभव शिक्षण देणारे विद्यापीठ व्हावे असे स्वप्न डॉ. संजय डी. पाटील यांनी पहिले होते. त्यानुसार तळसंदे येथील कॅम्पसमध्ये 'डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ' हे खासगी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडे विनंती अर्ज करण्यात आला. ९ डिसेंबर २०२० ला राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. १५ डिसेंबर २०२० ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी हे विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या कायद्याला मंजुरी दिली. त्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांनी २८ डिसेंबर २०२० रोजी या कायद्यावर स्वाक्षऱ्या करून त्याला अधिस्वीकृती दिली.

त्यानुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून नवे विद्यापीठ कार्यरत होत असून त्याचा आज १ जुलै रोजी शुभारंभ होत आहे. दादासाहेब व आईसाहेबांचा आशीर्वाद, डॉ. संजय पाटील यांचे नियोजन व धाकटे बंधू संस्थेचे उपाध्यक्ष सतेज पाटील व पुत्र विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्न व मेहनतीमधून हे विद्यापीठ आजपासून शैक्षणिक सेवेत रुजू होत आहे....... राज्यभरात 'कृषी दिन' म्हणून साजरा होत असतानाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतून या विद्यापीठाचा ऑनलाइन उद्घाटन सोहळ्याचा दुग्धशर्करा योग यानिमित्ताने जुळून आला आहे.

चौकट:

कृषी अर्थव्यवस्था होईल बळकट...

भविष्यकालीन गरजा ओळखून नव्या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयोगशील व अनुभवात्मक शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला वाव मिळावा अशा प्रकारे अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे....... विद्यापीठातील संशोधन, तंत्रज्ञान व विविध प्रयोगांचा शेतकरी बांधवाना फायदा होईल. कृषी अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यात डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ निश्चितच मोठे योगदान देईल. -डॉ. संजय डी. पाटील

कुलपती ..........

कोट कृषी संस्कृतीला आधुनिकतेची जोड...

कृषी संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहील. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही विद्यार्थी कृषीचे धडे गिरवण्यासाठी या ठिकाणी यावेत अशा प्रकरच्या सुविधा व नावलौकिक व्हावा यासाठी आमची सर्व टीम कार्यरत राहील. या विद्यापीठात वैज्ञानिक व तंत्रज्ञान पूरक शेतीचा विकास व त्याबतच्या संशोधनावर अधिक भर दिला जाईल. -आमदार ऋतुराज संजय पाटील,

विश्वस्त

कोट : शिक्षणात विद्यार्थी केंद्रित प्रकल्प राबवण्याबरोबर, मल्टिमीडियाचा वापर, ग्रुप ॲक्टिव्हिटी, गेस्ट लेक्चर्स, एकास एक चर्चा, प्रश्नमंजूषा, मार्गदर्शन व प्रशिक्षण या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष कामाचा जवळून अभ्यास व्हावा यासाठी उद्योगांना भेट, परिषद-कार्यशाळेतील सहभाग, इन्टर्नशिप, विशेष कार्यशाळा, लर्निंग एक्स्चेंज प्रोग्राम, संशोधनात्मक प्रकल्प, लाईव्ह प्रोजेक्ट आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.

डॉ. ए. के. गुप्ता

कार्यकारी संचालक

Web Title: Three decades of hard work and a flourishing paradise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.